Mobile Phone Addiction: पालकांनो, सावधान! तुमच्या मुलाच्या हातातला मोबाईल त्याचं जग हिरावून घेत नाहीये ना?
Mobile Phone Addiction in Teenagers:
सातार्यातील शाहूपुरीतील ही घटना. सुमीत एकुलता एक होता. आई-वडील दोघे काम करायचे. यामुळे घरचं स्थिरस्थावर होतं. सुमीत नववीतील गुणी मुलगा होता. शाळा, घर आणि थोडफार मित्रांसोबत खेळणे हा त्याचा नित्याचा दिनक्रम. याचवेळी त्याला सोशल मीडियाचा नाद लागला. फेसबुक या सोशल मीडियावर अकाऊंटदेखील हौसेने सुरु केले. यामुळे मित्रांसोबत खेळणे कमी होऊन तो ऑनलाईन अधिक राहू लागला. आभासी दुनियेत तो एवढा गुंग झाला की, पालकांसोबत कमी बोलणे होऊ लागले. मित्रांना तो टाळू लागला. शाळेतून आला की मोबाईल...मोबाईल आणि मोबाईल हेच त्याचे विश्व बनले होते.
मुलीचा मेसेज...
सुमीत मोबाईलवर ऑनलाईन राहण्यामध्ये एवढा गुंतला होता की, जेवण करताना, अभ्यास करताना अगदी टॉयलेट, बाथरुममध्ये जातानाही सोबत मोबाईल ठेवायचा. याला कारण होत फेसबुक मेसेजमध्ये त्याला अनोळखी मुलीचे मेसेज येत होते. अनोळखी मुलीनेच त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेज केला होता. मुलीचा मेसेज पाहून सुमीतला गुदगुल्या झाल्या होत्या. तू कोण? प्रोफाईलवरील फोटो तुझाच आहे का? तू कुठली? काय शिकते? तुला काय काय आवडते? असे असंख्य प्रश्न सुमीतने चॅटिंग करत विचारले होते. मुलीनेही त्याला बहुतांशी उत्तरे दिली होती. मुलीने मेसेज वाचले की नाही? तिने रिप्लाय दिला की नाही? हे मोबाईलवर सतत पाहण्याचे त्याला वेड लागले होते. मुलीचा प्रोफाईलवरील फोटो पाहून सुमीत तिच्या प्रेमात पडला होता.
अभ्यासातील अधोगती...
सुमीत ऑनलाईन प्रेमामध्ये आकंठ बुडाला होता. यामुळे त्याचा अभ्यास कमी झाला. शाळेतील सराव पेपरमधील त्याचे मार्क हळूहळू कमी होऊ लागले होते. याचे भान मात्र सुमीतला राहिले नव्हते. अशातच मुलीसोबत चॅटिंग करताना सुमीतने मुलीला एक चावट प्रश्न विचारला. सुमीतचा प्रश्न पाहून मुलगी दुखावली. मुलगी रुसली. तिने अबोला धरला. मुलीचे रिप्लाय येत नसल्याचे पाहून सुमीत कासावीस झाला. माफीचे दहाहून अधिक मेसेज केले. मात्र, तरीही मुलीने अबोला धरला. दोन दिवसांनंतर मात्र मुलीने सुमीतने केलेला चावट मेसेज आई-वडिलांना दाखवणार आहे व तुझ्यावर गुन्हा दाखल करणार असा रिप्लाय केला. यामुळे सुमीत हादरून गेला. प्लीज अस करू नको. तू मला माफ कर. माझी फ्रेंडशिप नको असेल, तर तसे कर पण माझे मेसेज तुझ्या आई-वडिलांना दाखवू नको. माझ्यावर गुन्हा दाखल करू नको, अशी विनवणी सुमीत मुलीला मेसेज करून करत होता.
गळफासाने जीवन संपविले
मुलगी मेसेज दाखवणार. तिचे आई-वडील आपल्यावर गुन्हा दाखल करणार, अशी भीती सुमीतला वाटू लागली. यामुळे सुमीत पुरता खचून गेला. त्याने सुरुवातीला हा विषय कोणालाच सांगितला नाही. सुमीतने फोनवरून एकदा त्याच्या मामाला ‘फेसबुकवरील मेसेजमुळे गुन्हा दाखल होतो का?’ असा प्रश्न विचारला होता. मात्र, याउपर त्याने कोणालाच त्याला वाटत असलेली भीती सांगितली नाही. सुमीत हळूहळू मानसिक तणावाखाली गेला. आलेल्या नैराश्यातून सुमीतने गळफास घेऊन जीवन संपविले.
दोन महिन्यांनी मिळाला क्लू..
सुमीतने जीवन संपवल्यानंतर कुटुंबावर आभाळ कोसळले. सुमीतने आत्महत्या का केली? हे गुपित कोणालाच समजायला तयार नव्हते. त्याने चिठ्ठी लिहिली नव्हती की, कधी कोणाकडे विषय काढला नव्हता. पोलिस दप्तरी या घटनेनंतर अनेकांचे जाबजबाब झाले. चौकशी झाली. मात्र, पोलिसांच्या हाती नेमके कारण काहीच समोर आले नाही. सुमीतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मामाला अचानक आठवले की, सुमीतने फेसबुकची माहिती विचारून त्यावरील मेसेजने गुन्हा दाखल होतो का? असा प्रश्न विचारला होता. हा क्लू पुढे या केसला टर्निंग पॉईंट ठरला. सुमीतच्या मामाने ही बाब पोलिसांना सांगितली.
मेसेज करणारा तो सुमीतचा मित्र होता..
पोलिसांनी सुमीतचे फेसबुक अकाउंट तपासण्यास सुरुवात केली. सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन सुमीत वापरत असलेल्या फेसबुक खात्याचा अॅक्सेस पोलिसांना मिळाला. सुमीतच्या फेसबुक खात्यावरील सर्व पोस्ट, त्याने लाईक केलेले व त्याच्या फोटोंना कोणी लाईक केले, कॉमेंट, शेअर हे सर्व पर्याय पोलिसांनी तपासले. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. मेसेज या पर्यायामध्ये गेल्यानंतर मात्र पोलिसही हादरून गेले. एका मुलीसोबत सुमीत चॅटिंग करत असल्याचे दिसून आले. सुमारे हजारो मेसेज दोघांनी एकमेकांना केले होते. पोलिसांनी सर्व मेसेज वाचून काढत त्या मुलीची अधिक माहिती घेत असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. वास्तविक सुमीतला मेसेज करणारी मुलगी नव्हती, तर तो एक मुलगा होता. तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नव्हता, तर सुमीतचा मित्रच होता.

