जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यांत गेल्या काही वर्षांपासून मुतखड्याच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. आधी हा आजार प्रामुख्याने मध्यमवयीन किंवा वृद्धांमध्ये आढळत होता; मात्र आता १८ ते ४५ वयोगटातील तरुणदेखील मोठ्या प्रमाणावर या आजाराने त्रस्त होत आहेत. डॉक्टरांच्या मते, बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि कमी पाणी पिण्याचा दुष्परिणाम किडनीवर होत असून मुतखड्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.
फास्ट फूड, जंक फूड, जास्त मीठ, पॅकेज्ड फूड, कोल्ड्रिंक, मद्यसेवन, तंबाखू हे सर्व पदार्थ शरीरातील केमिकल आणि सॉल्टचे प्रमाण वाढवतात. हे क्षार शरीरातून फिल्टर होताना मूत्रपिंडात साठू लागतात आणि पुढे दगडाच्या आकाराचे ‘स्टोन’ तयार होतात. त्यामुळे तीव्र वेदना, उलट्या, जळजळ, मूत्रमार्ग बंद होणे अशी त्रासदायक लक्षणे निर्माण होतात.
आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी 10 ते 15 रुग्ण केवळ किडनी स्टोनमुळे दाखल होत आहेत. अनेकांना एंडोस्कोपी, लेसर उपचार किंवा शस्त्रक्रिया करावी लागत आहे. त्यामुळे उपचार खर्च वाढून अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येत आहे. छोट्या शहरांमध्ये तर हे उपचार महाग असल्याने काही रुग्ण उपचार अर्धवट सोडतात, ज्यामुळे पुढे किडनीचे गंभीर आजार उद्भवू शकतात.
कामाचा वाढलेला ताण, दिवसभर लॅपटॉप-मोबाईल वापर, रात्री उशिरापर्यंत जागरण, व्यायामाचा पूर्ण अभाव या गोष्टींमुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया विस्कळीत होत असून किडनीचे फिल्टरेशन कमी होते. पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे मूत्र घट्ट होते आणि त्यातील क्षार किडनीमध्ये साचू लागतात. यामुळे मुतखडा तयार होण्याचा धोका वाढतो.
आरोग्य तज्ज्ञांनी मुतखड्यापासून बचावासाठी दररोज 2.5 ते 3 लिटर स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर कमी मीठ, कमी तेलकट पदार्थ, जंक फूड टाळणे, भाजीपाला व फळे यांचा अधिक समावेश करणे, दिवसातून किमान 30 मिनिटे चालणे किंवा घरगुती व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळोवेळी तपासणी करून किडनीची कार्यक्षम्ता तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
वेळीच लक्षणे ओळखून उपचार न घेतल्यास मुतखडा किडनीच्या नलिकांना अडथळा निर्माण करतो आणि दीर्घकाळ तसेच राहिल्यास किडनी निकामी होण्याचा (किडनी फेल्युअर) धोका संभवतो. त्यामुळे मूत्रात जळजळ, वेदना, पाठदुखी, रक्त येणे, वारंवार लघवी लागणे अशी लक्षणे दिसताच उपचार घेणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
“मुतखड्याचा आजार सध्या वाढत्या प्रमाणात आढळतोय. सतत पाणी कमी पिणे, जास्त मीठ व जंक फूडच्या सवयींमुळे किडनीवर ताण येतो. वेळीच लक्षणांकडे लक्ष दिले नाही तर किडनीचे गंभीर आजार उद्भवू शकतात.”— डॉ. अशोक काळे, गेवराई