प्रातिनिधिक छायाचित्र.  AI-generated image
आरोग्य

Centenarian longevity secret : शंभरीपार आयुष्य जगण्याचे रहस्य काय? जपानी संशोधकांना मिळाला पेशींमधील महत्त्वाचा पुरावा

दीर्घायुष्‍य लाभलेल्‍या व्यक्तींमध्ये एका विशिष्ट आणि दुर्मिळ प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशींचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे संशोधनात समोर आले

पुढारी वृत्तसेवा

Centenarian longevity secret : काही व्यक्ती १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे दीर्घायुष्य अगदी सहज कसे जगतात? याचे महत्त्वाचे रहस्य जपानमधील संशोधकांनी उलगडले आहे. १०० वर्षे किंवा त्याहून अधिक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींमध्ये एका विशिष्ट आणि दुर्मिळ प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशींचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे संशोधनात समोर आले आहे.

काय आहे नवे संशोधन?

जपानच्या ओसाका युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष 'सेल रिपोर्ट्स' या प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाले आहेत. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा भाग असलेल्या 'CD4 CTLs' नावाच्या पांढऱ्या रक्तपेशी १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणीयरीत्या वाढतात. तरुण व्यक्तींच्या शरीरात या टी-पेशींचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असते. मात्र, ११० वर्षे किंवा त्याहून अधिक आयुष्य जगलेल्या अति-दीर्घायुषी व्यक्तींमध्ये हे प्रमाण सरासरी १७.६ टक्के इतके आढळले.

वयानुसार पेशींमध्ये होणारा बदल

संशोधकांनी ७० ते ९९, १०० ते १०९ आणि ११० वर्षांहून अधिक अशा तीन वयोगटांतील २८ व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यात वयानुसार या पे‍शींची टक्केवारी अनुक्रमे ४%, ९.६% आणि १७.६% अशी वाढल्याचे स्पष्ट झाले. वयोमानानुसार शरीरातील इतर अवयव क्षीण होत असताना या पेशी मात्र वाढत्या वयाशी जुळवून घेतात आणि आक्रमकपणे कार्य करतात, असे संशोधनात स्‍पष्‍ट झाले.

निरोगी दीर्घायुष्याचे मॉडेल

अति-दीर्घायुषी व्यक्ती कर्करोग किंवा हृदयविकारासारख्या गंभीर आजारांना दूर ठेवून निरोगी आयुष्य जगतात. या पेशी शरीरात साचणाऱ्या जुन्या खराब पेशींना नष्ट करतात आणि ट्युमरविरुद्ध (गाठी) लढा देऊन कर्करोगाचा धोका टाळण्यास मदत करतात. "दीर्घायुषी व्यक्तींमध्ये या पेशींचा झालेला हा विशेष विस्तार दर्शवतो की, अत्यंत वृद्धपकाळातही मानवी रोगप्रतिकार प्रणाली वाढत्या वयाच्या आव्हानांशी जुळवून घेऊ शकते," असे प्रमुख संशोधक डॉ. कोसुके हाशिमोतो यांनी म्‍हटले आहे. तथापि, केवळ या पेशींच्या अधिक प्रमाणामुळेच आयुष्य वाढते का, याचे अंतिम पुरावे मिळण्यासाठी या पेशी मानवी उतींमध्ये (टिश्यू) कशा प्रकारे काम करतात, याचा पुढील अभ्यास आता केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT