प्रातिकात्‍मक छायाचित्र.  intermittent fasting PCOS
आरोग्य

'इंटरमिटंट फास्टिंग' ठरू शकते pcosवर प्रभावी; वजन कमी होण्‍याबरोबरच हार्मोन्समध्ये सुधारणा, जाणून घ्‍या नवीन संशोधन

intermittent fasting PCOS | इंटरमिटंट फास्टिंगमुळे PCOS असलेल्या व्यक्तींमध्ये हार्मोन्समध्ये सकारात्मक बदल

पुढारी वृत्तसेवा

intermittent fasting

लंडन : जगभरातील महिलांमध्ये आढळणाऱ्या 'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' (PCOS) या समस्येवर 'इंटरमिटंट फास्टिंग' (ठराविक काळाने उपवास करणे) अत्यंत गुणकारी ठरू शकते, असे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. या पद्धतीमुळे केवळ वजन कमी होण्यास मदत होत नाही, तर शरीरातील संप्रेरकांचे (हार्मोन्स) संतुलन राखण्यासही मोठी मदत होते.

पीसीओएस आणि वजनाचा अडथळा

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगभरातील प्रजननक्षम वयोगटातील दर १० पैकी एका महिलेला 'पीसीओएस'चा त्रास आहे. या आजारात वजन कमी करणे अत्यंत कठीण असते, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. अलीकडेच नेचर मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, इंटरमिटंट फास्टिंगमुळे PCOS असलेल्या व्यक्तींमध्ये हार्मोन्समध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

संशोधनातील निष्कर्ष

हे संशोधन ७६ सहभागींवर ६ महिने करण्यात आले होते. त्यांना तीन गटांत विभागले गेले:

१. टीआरई (Time-Restricted Eating) गट: दुपारी १ ते संध्याकाळी ७ या वेळेतच जेवण.

२. कॅलरी नियंत्रण गट: दररोजच्या कॅलरीजमध्ये २५% कपात.

३. नियंत्रित गट: आहारावर कोणतेही बंधन नाही.

सहा महिन्यांनंतर असे दिसून आले की, ठराविक वेळेत जेवणाऱ्या (TRE) गटामध्ये वजनासोबतच टेस्टोस्टेरॉन आणि 'A1C' (मधुमेहाचा धोका दर्शवणारा घटक) पातळीत लक्षणीय घट झाली. कॅलरी मोजण्यापेक्षा इंटरमिटंट फास्टिंग पाळणे अधिक सोपे असल्याचेही सहभागींनी सांगितले.

औषधांना उत्तम पर्याय

सध्या 'पीसीओएस'वर उपचार म्हणून हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र, त्याचे मानसिक आरोग्य, चयापचय क्रिया आणि लैंगिक इच्छेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयमधील संशोधक डॉ. क्रिस्टा वराडी म्हणतात, "आम्ही महिलांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहोत. जर एखाद्या महिलेने तिच्या शरीराचे ५% वजन कमी केले, तरीही औषधांशिवाय टेस्टोस्टेरॉनची पातळी नियंत्रित करता येते."

आहार पद्धती अवलंबताना काय लक्षात घ्यावे?

तज्ज्ञांच्या मते, इंटरमिटंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी संतुलित आहाराची सवय लावणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या दिनचर्येनुसार ६ ते ८ तासांचा ‘ईटिंग विंडो’ निवडणे योग्य ठरते. झोपण्याच्या किमान एक तास आधी अन्न सेवन थांबवणे आणि दररोज एकाच वेळापत्रकाचे पालन करणे फायदेशीर ठरते.तसेच, सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठरावीक वेळेतच अन्न सेवन केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार, PCOS असलेल्या व्यक्तींनी इंटरमिटंट फास्टिंगसोबतच आहारात बदल करणेही आवश्यक आहे. यामध्ये कमी स्टार्चयुक्त भाज्यांचे प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे आणि पुरेशा प्रमाणात प्रथिने (प्रोटीन) घेणे यांचा समावेश होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT