HbA1c test
नवी दिल्ली : मधुमेहाचे निदान आणि देखरेखीसाठी जगभरात सर्रास वापरली जाणारी 'HbA1c' (ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) ही रक्तचाचणी दक्षिण आशियातील, विशेषतः भारतातील कोट्यवधी लोकांसाठी दिशाभूल करणारी ठरू शकते. 'लॅन्सेट रिजनल हेल्थ - साऊथइस्ट एशिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनानुसार, भारतातील ॲनिमिया (रक्तक्षय) आणि रक्ताशी संबंधित अनुवांशिक आजारांचे मोठे प्रमाण याला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्येष्ठ एंडोक्राइनोलॉजिस्ट प्रो. अनूप मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, HbA1c चाचणी रक्तातील गेल्या तीन महिन्यांतील सरासरी साखरेचे प्रमाण मोजते. मात्र, ज्या व्यक्तींना लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया, हिमोग्लोबिनोपॅथी किंवा 'G6PD' यांसारखे रक्ताचे विकार आहेत, त्यांच्या बाबतीत ही चाचणी साखरेचे प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी दाखवू शकते.
याबाबत फोर्टिस सी-डॉक सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिसचे अध्यक्ष प्रो. अनूप मिश्रा म्हणाले, "भारतासारख्या देशात, जिथे कुपोषणामुळे होणारा ॲनिमिया आणि लाल रक्तपेशींचे विकार मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथे केवळ HbA1c चाचणीवर अवलंबून राहिल्याने मधुमेहाचे चुकीचे निदान होऊ शकते."
मुंबईतील 'जोशी क्लिनिक'चे एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी स्पष्ट केले की, रक्तातील दोषांमुळे शहरातील सुसज्ज रुग्णालयांमध्येही HbA1c च्या निकालात तफावत दिसून येते. "ग्रामीण आणि आदिवासी भागात, जिथे ॲनिमिया आणि अनुवांशिक रक्तविकार अधिक आहेत, तिथे ही तफावत अधिक गंभीर असू शकते," असेही त्यांनी नमूद केले.भारतातील काही भागांत अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया आहे. तसेच, पुरुषांमध्ये आढळणाऱ्या 'G6PD' कमतरतेमुळे मधुमेहाचे निदान होण्यास तब्बल चार वर्षांचा विलंब होऊ शकतो, ज्यामुळे पुढील काळात गुंतागुंत वाढण्याचा धोका निर्माण होतो.
केवळ HbA1c या एका चाचणीवर अवलंबून न राहता, अभ्यासात खालील पर्यायांचा विचार करण्याचे सुचवण्यात आले आहे की...
मधुमेह निदानासाठी 'ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट'चा वापर करणे.
स्वयं-तपासणी: रक्तातील साखरेची नियमित घरगुती तपासणी (Self-monitoring).
केवळ HbA1c चा विचार न करता रक्तातील हिमोग्लोबिनच्या स्थितीचीही तपासणी करणे.