Hair Care Tips File Photo
आरोग्य

Hair Care Tips | लोहाची कमतरता आणि केस गळती

पुढारी वृत्तसेवा

लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली केस गळतीची समस्या ही कायमस्वरूपाची नसते. त्यामुळे रक्तचाचणी केल्यानंतर लोहाची पातळी सुधारण्यासाठी लोहपूरक औषधे घेऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारातही लोहाची कमतरता भरून काढणारे अन्नपदार्थ सेवन करू शकतो. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी योग्य राहील.

दाट केस संभाराला नेमके काय होते ते कळत नाही आणि भरपुर केस गळू लागतात. मग, टक्कल पडेल की काय, ही भीती सतावू लागते तेव्हा आपल्याला जाग येते; मात्र केस अचानक गळण्याचे कारण काही कळत नाही.

एका दिवसात पन्नास ते शंभर केस गळणे ही अगदीच सर्वमान्य गोष्ट आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ मानतात; मात्र त्यापेक्षा अधिक केस गळत असतील, तर नक्कीच विचार करायला हवा आणि योग्य सल्ला घेऊन केस गळतीचे नेमके कारण शोधले पाहिजे. दरवेळी बाह्य कारकांमुळे केस गळत असतील असे नाही, तर पोषक घटकांची कमतरता हे देखील कारण असू शकते.

पूर्वी केस गळण्याची समस्या ही प्रौढ वयात, वयस्कर झाल्यानंतर जाणवत असे. आता मात्र अगदी तरुण वयातच मोठ्या प्रमाणात केस गळत असल्याचे दिसून येते. काही वेळा अगदी सहा-सात वर्षांच्या मुलांमध्येही केस गळत असल्याचे दिसून येते.

या मागचे कारण काय असावे, असा प्रश्न तज्ज्ञांना विचारल्यास केस गळतीची अनेक कारणे असू शकतात असे त्यांचे मत आहे. जसे अनुवांशिक आजार, शरीराला पोषक घटकांची कमतरता भासणे, धूळ, प्रदूषण, कचरा, केसाची योग्य देखभाल न केल्यास, अयोग्य जीवनशैली या सर्वांचाही केसाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याव्यतिरिक्त शरीरात लोहाची कमतरता असेल, तरीही केस गळू शकतात, ही गोष्ट आपल्याही ऐकिवात आली असेल.

शरीरातील लोहाचा आणि केसाचा नेमका काय संबंध आहे, हे समजून घेऊन लोहाची कमतरता भरून काढल्यास केस गळती थांबवता येऊ शकते. केसाच्या रोमछिद्रांमधून केसाचे पोषण होत असते. त्यामुळे केसाला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळाला पाहिजे, यासाठी रोज केसाला चांगल्या तेलाने मसाज करावा असा सल्ला दिला जातो.

केसाच्या मुळाशी तेल लावून मसाज केल्यास त्या भागातील रक्ताभिसरण वाढते आणि त्याचवरोबर ऑक्सिजनचाही पुरवठा होतो. आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण योग्य असेल, तर हेच हिमोग्लोबिन सर्व शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करीत असते, त्यामुळे शरीरातील पेशींची वाढ होते आणि पेशींचे नुकसान झाले असेल, तर त्यांची दुरुस्ती करण्याचे कामही त्यामुळे होते.

रक्तामधील हिमोग्लोबिन हे केसवाढीसाठी आवश्यक पेशींना उत्तेजना देत असते. त्यामुळे अचानक केस गळत असल्याचा अनुभव येत असेल तर डॉक्टरकडे जाऊन रक्तातील लोहाची पातळी योग्य आहे हे एकदा तपासून घ्यावे. लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली केस गळतीची समस्या ही कायमस्वरूपाची नसते.

त्यामुळे रक्तचाचणी केल्यानंतर लोहाची पातळी सुधारण्यासाठी लोहपूरक औषधे घेऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारातही लोहाची कमतरता भरून काढणारे अन्नपदार्थ सेवन करू शकतो. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी योग्य राहील. पर्यायाने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघाल्याने हळूहळू केस गळतीदेखील कमी होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT