Hair Growth Exercises:
सध्या केस गळणे आणि केसांची वाढ मंदावणे या समस्या अनेकांसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. यावर उपाय म्हणून अनेक लोक महागडी हेअर सीरम, तेलं आणि इतर उत्पादनांचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, काही साधे व्यायामही तुमच्या 'हेअर केअर' रुटीनचा भाग असू शकतात?
'prachiheals_' या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये केसांच्या मुळांची काळजी घेण्यासाठी तीन पद्धती सुचवण्यात आल्या आहेत. बॅक-कॉम्बिंग (उलट दिशेने विंचरणे), केसांना हलक्या हाताने ओढणे आणि सर्वांगासन करणे. या पद्धती कशा करायच्या आणि त्या करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.
व्हिडिओमध्ये सांगितलेली पहिली पद्धत म्हणजे 'बॅक-कॉम्बिंग'. यासाठी पुढे वाका आणि मानेच्या मागच्या बाजूने केसांच्या मुळांजवळून समोरच्या दिशेने कंगवा फिरवा. हे सुमारे २ ते ३ मिनिटे करावे, असे सुचवण्यात आले आहे. यामुळे टाळूला हलकी चालना मिळते. मात्र, कंगवा खूप जोरात फिरवू नका, अन्यथा केस तुटू शकतात.
दुसरी पद्धत म्हणजे, बोटांनी केसांच्या मुळांजवळ पकडणे. केसांचे काही भाग हलक्या हाताने धरा आणि त्यांना थोड्या प्रमाणात हलवा. लक्षात ठेवा, केसांना जोरात ओढू नका; याचा उद्देश टाळूला हलका मसाज देणे हा आहे. केस जोरात ओढल्यास ते गळू शकतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
तिसरी पद्धत म्हणजे 'सर्वांगासन'. हे एक असे योगासन आहे ज्यामध्ये शरीर खांद्यावर पेलले जाते आणि पाय वरच्या दिशेला असतात. या आसनामुळे डोक्याच्या दिशेने होणारा रक्तप्रवाह वाढतो, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मात्र, यामुळे थेट केसांची वाढ होते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. जर तुम्हाला मानेच्या समस्या, उच्च रक्तदाब किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय हे व्यायाम करू नका.
या पद्धतींना केसांच्या वाढीसाठी खात्रीशीर उपाय मानले जाऊ शकत नाही. बॅककॉम्बिंग, केस ओढणे किंवा सर्वांगासन यांमुळे केसांची वाढ वेगाने होते, यासाठी सध्या पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. केसांच्या निरोगी वाढीसाठी, संतुलित आहार, पुरेसे प्रथिने सेवन, पुरेशी झोप आणि टाळूची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अचानक केस गळतीचा अनुभव येत असेल, टक्कल पडल्याचे लक्षात आले असेल किंवा केस गळती सातत्याने वाढत असल्याचे आढळले, तर त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या.