Fast Food Linked to Teenager’s Death: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात फास्ट फूड खाण्यामुळे एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 18 वर्षांच्या इलमा अहमद हिचा दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालय येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तब्बल नऊ दिवस ती रुग्णालयात होती.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फास्ट फूडमध्ये वापरल्या जाणाऱ्या दूषित पत्ताकोबीमधून एक किडा इलमाच्या शरीरात गेला. हा किडा मेंदूपर्यंत पोहोचला आणि मेंदूमध्ये तब्बल 25 गाठी तयार झाल्या. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, परंतु आजार वाढल्याने तिचा मृत्यू झाला.
इलमा अमरोहातील चुचैला कलां गावातील रहिवासी होती. ती NEET परीक्षेची तयारी करत होती. सुमारे महिनाभरापूर्वी तिला टायफॉईड झाला होता. त्यानंतर तिची तब्येत सतत खालावत होती. नोएडातील खासगी रुग्णालयात केलेल्या CT स्कॅन आणि MRI तपासणीत सुरुवातीला 7–8 गाठी आढळल्या. काही दिवसांतच या गाठींची संख्या झपाट्याने वाढून 20–25 वर पोहोचली.
कुटुंबीयांनी सांगितले की, इलमाला फास्ट फूड खाण्याची आवड होती. घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे पदार्थ, विशेषतः कार्यक्रमांमध्ये मिळणारे फास्ट फूड ती जास्त खात असे. डॉक्टरांनीही दूषित भाज्यांमधून शरीरात गेलेला किडा या आजारामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे, याच अमरोहा जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी 11वीत शिकणाऱ्या अहाना नावाच्या विद्यार्थिनीचाही मृत्यू झाला होता. फास्ट फूड खाण्यामुळे तिला पचनसंस्थेचा गंभीर आजार झाला होता. तिच्या आतड्यांवर चिकटपणा आला होता. शस्त्रक्रिया करूनही ती वाचू शकली नाही.
जागतिक आरोग्य अहवालांनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे 1.1 कोटी मृत्यू फास्ट फूडशी संबंधित आजारांमुळे होतात. हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, पचनसंस्थेचे विकार आणि मेंदूवर होणारा परिणाम, असे अनेक गंभीर आजार फास्ट फूडमुळे होतात.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, फास्ट फूडमध्ये फायबर नसते, साखर आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनसंस्था बिघडते, स्मरणशक्ती कमी होते आणि आजारांचा धोका वाढतो.