

नाशिक : आरोग्याला घातक ठरणारे बर्गर, पिझ्झा, तळलेले स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड जंक फूडच्या विक्रीला शाळा, महाविदयालयांच्या उपहारगृहांमध्ये बंदी घालावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव रमीज पठाण यांनी शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शिक्षण उपसंचालक संजयकुमार राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रमीज पठाण यांच्यासह विवेक देशमुख, अनुज उदावंत, कार्तिक जाधव उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, शाळांच्या उपहारगृहांमध्ये आरोग्यास घातक फास्ट फूडची सर्रास विक्री सुरू आहे. बर्गर, पिझ्झा, तळलेले स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड जंक फूड यांसारखे अन्नपदार्थ शालेय कॅन्टीनमध्ये वाढत्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १५ जुलै २०२४ च्या परिपत्रकानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये आरोग्यास घातक अन्नपदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उच्च शिक्षण संस्थांच्या उपहारगृहांमध्ये या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे शाळांमधील उपहारगृहांमध्ये फास्ट फूडची विक्री त्वरीत थांबवावी. फळे, दुधापासून बनवलेले स्नॅक्स, ताजे रस आणि संतुलित जेवण यासारखे पौष्टिक अन्नपदार्थ उपहारगृहांमध्ये उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहन द्यावे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, एकाग्रता आणि शैक्षणिक कामगिरी दीर्घकाळात सुधारण्यास मदत होईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.