रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेत SSI Mantra प्रणालीच्या दोन स्वतंत्र सर्जन कन्सोल आणि पाच रोबोटिक आर्मचा एकाच वेळी वापर करण्यात आला.
Robotic Bypass Surgery Medanta
नवी दिल्ली : भारताने रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात स्वदेशी विकसित SSI Mantra सर्जिकल रोबोटिक सिस्टीमच्या मदतीने जगातील पहिली ड्युअल कन्सोल आणि पाच रोबोटिक आर्म असलेली बीटिंग हार्ट टोटली एंडोस्कोपिक कोरोनरी आर्टरी बायपास (TECAB) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णाचे हृदय नैसर्गिकरीत्या धडधडत होते. तसेच हार्ट-लंग मशीनचाही वापर करण्यात आला नाही.
ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया मेदांता, गुरुग्राम येथील रोबोटिक आणि मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डियाक सर्जन डॉ. नितीन कुमार राजपूत आणि मणिपाल हॉस्पिटल, जयपूरचे मुख्य कार्डियाक सर्जन डॉ. ललित मलिक यांनी संयुक्तपणे केली. SS Innovations International चे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर पी. श्रीवास्तव यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले.
या शस्त्रक्रियेत SSI Mantra प्रणालीच्या दोन स्वतंत्र सर्जन कन्सोल आणि पाच रोबोटिक आर्मचा एकाच वेळी वापर करण्यात आला. या ड्युअल कन्सोल तंत्रज्ञानामुळे दोन्ही सर्जन स्वतंत्र कन्सोलवरून रोबोटिक आर्म नियंत्रित करत एकाच वेळी समन्वयाने शस्त्रक्रिया करू शकले. याशिवाय हार्ट स्टॅबिलायझेशन प्रणालीच्या मदतीने धडधडणाऱ्या हृदयाचा ज्या भागावर बायपास करायचा होता, तो भाग स्थिर ठेवण्यात आला.
TECAB म्हणजे 'टोटली एंडोस्कोपिक कोरोनरी आर्टरी बायपास'. ही हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेची अत्याधुनिक आणि अत्यंत गुंतागुंतीची पद्धत आहे. पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेत छाती उघडावी लागते. मात्र, या तंत्रज्ञानामध्ये छातीवर लहान छेद देऊन रोबोटिक प्रणालीच्या मदतीने शस्त्रक्रिया केली जाती. त्यामुळे सर्जनला अत्यंत सूक्ष्म आणि अचूक हालचाली करणे शक्य होते. विशेष म्हणजे बीटिंग हार्ट तंत्रज्ञानामुळे रुग्णाचे हृदय सुरूच राहते आणि हार्ट-लंग मशीनची आवश्यकता भासत नाही.
या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या १५ दिवसांच्या प्रकृती सुधारण्याच्या प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. रोबोटिक आणि मिनिमली इनव्हेसिव्ह हृदय शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णांना उपचारांचा अधिक चांगला अनुभव देण्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.
मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश त्रेहान यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रातील नावीन्य, शस्त्रक्रियेतील उत्कृष्टता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हृदयरोग उपचार अधिक प्रगत करण्याच्या मेदांता रुग्णालयाच्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
SS Innovations चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर पी. श्रीवास्तव यांनीही या यशाला भारतीय सर्जिकल रोबोटिक्समधील महत्त्वाचा टप्पा म्हटले. 'मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या SSI Mantra प्रणालीने जागतिक स्तरावरील प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये भारताची क्षमता दाखवून दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशामुळे स्वदेशी वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षमतेला नवी ओळख मिळाली असून, जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रात भारतीय सर्जिकल रोबोटिक्सची भूमिका अधिक भक्कम होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.