प्रतीकात्मक छायाचित्र ( AI-generated image ) Pudhari
आरोग्य

Dogs Detect Cancer : अवघ्या ६० सेकंदांत 'कॅन्सर'चे निदान! जाणून घ्‍या वैद्यकीय संशोधनात माणसाच्या जिवलग मित्राची अद्भूत कमाल

कुत्र्यांची अफाट घ्राणशक्ती भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात घडवू शकते मोठी क्रांती

पुढारी वृत्तसेवा

Dogs Detect Cancer : मानवाचा जिवलग मित्र, अशी कुत्रा या प्राणची ओळख आहे. मात्र आता हाच प्राणी वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि आश्चर्यकारक भूमिका बजावतो आहे. तो अवघ्या एका मिनिटापेक्षा कमी वेळात तब्बल ७२ नमुने हुंगत कर्करोग (कॅन्सर) असलेल्या रुग्णाचा श्वासाचा नमुना अत्यंत अचूकपणे ओळखतो, असे एका प्रयोगातून सिद्‍ध झाले आहे. मानवी श्वासावरून कर्करोगाचे अचूक निदान करण्याची कुत्र्यांची ही अफाट घ्राणशक्ती भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडवू शकते, हेच या प्रयोगाने सिद्ध केले आहे. जाणून घेवूया या प्रयोगाविषयी...

इस्रायली लष्करातील माजी तज्ज्ञाचा अनोखा प्रयोग

'हिंदुस्तान टाईम्स'च्या रिपार्टनुसार, बंगळूरुजवळील नीलमंगला येथील 'डोग्नोसिस' फार्मवर सध्या १५ कुत्र्यांना माणसाचा श्वास हुंगून कर्करोग (कॅन्सर) ओळखण्याचे खास प्रशिक्षण दिले जात आहे. या स्टार्टअपचे सह-संस्थापक इतामार बिटान हे मूळचे इस्रायलचे असून, त्यांनी इस्रायली सैन्याच्या बॉम्ब शोधक श्वान पथकात चार वर्षे काम केले आहे. भारतात हे काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी कुत्र्यांच्या मदतीने 'कोविड-१९' शोधण्याचा यशस्वी प्रयोगही केला होता. सामान्यतः डॉक्टर आणि रुग्णालये रक्त किंवा श्वासाचे नमुने यंत्रांद्वारे (मशीन्स) तपासण्यास सरावलेले असतात. मात्र, या पद्धतीत थेट सजीव प्राण्यांचा (कुत्र्यांचा) समावेश असल्यामुळे आणि त्यांच्या स्वभावात बदल होऊ शकत असल्यामुळे, काही जण या चाचणीच्या अचूकतेवर शंका घेऊ शकतात. हे आव्हान स्वीकारत बिटान सांगतात की, ही पद्धत पूर्णपणे नवीन आणि अपारंपरिक असल्यामुळे, लोकांनी तिचा स्वीकार करावा यासाठी ती नेहमीच्या लॅब चाचण्यांपेक्षा किमान १० पट अधिक अचूक आणि उत्तम असणे आवश्यक आहे; आणि आम्ही तेच सिद्ध करत आहोत.

कुत्र्यांना आजारांचा वास येतो; पण आपल्याला कसे सांगणार? उत्तरासाठी AI मदतीला!

माणसाच्या तुलनेत कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता कमालीची अफाट असते. माणसाच्या नाकात ५० ते ६० लाख घ्राणेंद्रिय रिसेप्टर्स (वासाचे कण ओळखणारे घटक) असतात. हे रिसेप्‍टर्स कुत्र्यांमध्ये तब्बल ३० कोटी असतात! याच ताकदीमुळे कुत्रे कर्करोग, कोविड-१९, मलेरिया आणि पार्किन्सन्स सारख्या गंभीर आजारांचा वास ओळखू शकतात, हे वैज्ञानिक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मात्र, यात सर्वात मोठी अडचण ही आहे की, कुत्र्याला नक्की कसला वास आला आहे आणि तो काय सांगू पाहतोय, हे माणसाला कसे समजणार? सध्या हे समजून घेण्यासाठी एका प्रशिक्षित ट्रेनरची गरज पडते. हीच अडचण दूर करण्यासाठी 'डॉगनोसिस' हे स्टार्टअप आता व्हिडिओ डेटा, सेन्सर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. कुत्र्याने एखादा आजार हुंगल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, हालचाली आणि मानसिक स्थिती कशी बदलते, याचा डेटा सेन्सर्स आणि 'एआय'द्वारे गोळा करून त्याचे अचूक विश्लेषण जाणार आहे. स्टार्टअपचे सह-संस्थापक आकाश कुलगोड यांनी दिली. आकाश यांनी २०२३ मध्ये लिंक्डइनवरून इस्रायलच्या बिटान यांच्याशी संपर्क साधला आणि या अनोख्या कल्पनेतून 'डॉगनोसिस'ची सुरुवात झाली. या विज्ञानावर आधारित कल्पनेसाठी त्यांना गुंतवणूकदारांकडून १६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १३० कोटींहून अधिक रुपये) मिळाले असून, पुढील तीन वर्षांत लॅब, तंत्रज्ञान आणि ५० कर्मचाऱ्यांच्या टीमसह ही पद्धत प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे काम वेगाने सुरू आहे.

जगातील केवळ ३ स्टार्टअप्स यावर करतायत काम; जाणून घ्या यामागचे मोठे आव्हान

या नव्या तंत्रज्ञानात काम करणे खूप अवघड आहे, म्हणूनच जगभरात केवळ तीनच कंपन्या (स्टार्टअप्स) यावर काम करत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, बॉम्ब शोधताना कुत्र्यांना ठराविक रसायनांचा वास घ्यायला शिकवले जाते; पण कर्करोग (कॅन्सर) ओळखताना कुत्रे नक्की कोणत्या रसायनाचा वास घेतात, हे वैज्ञानिकांना अजूनही शोधता आलेले नाही. 'डॉगनोसिस'चे बिटन सांगतात की, कर्करोगाशी संबंधित ही रसायने खूप सूक्ष्म असतात. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा प्रकार आणि आजूबाजूच्या वातावरणानुसार या वासांमध्ये बदल होत राहतो, त्यामुळे यंत्रांच्या मदतीने त्यांचे अचूक मोजमाप करणे अत्यंत कठीण जाते.

आजार ओळखण्यासाठी तंत्रज्ञान पद्धती

माणसाला किंवा यंत्राला वासाचा अचूक अर्थ लावणे किंवा त्याचे वर्गीकरण करणे अजूनही खूप अवघड आहे. यावर उपाय म्हणून 'डॉगनोसिस' कंपनीने एक भन्नाट कल्पना शोधली आहे. ते प्रत्येक कुत्र्यासाठी 'स्निफ डायरी' (Sniff Diary) नावाची एक 'डिजिटल प्रतिकृती' म्हणजेच कॉम्प्युटरवर त्यांची एक खास प्रोफाईल तयार करतात.या डिजिटल डायरीमध्ये प्रत्येक कुत्र्याची जुनी माहिती, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी आणि चाचणीच्या वेळच्या त्याच्या हालचाली नोंदवल्या जातात. एवढेच नाही तर, चाचणी दरम्यान कुत्र्याचा श्वास कसा चालला आहे, त्याच्या मेंदूची आणि शरीराची हालचाल कशी होतेय, या सर्वांची माहिती सेन्सर्सद्वारे गोळा केली जाते. सोबतच ट्रेनरचे निरीक्षणही यात जोडले जाते. हा सर्व डेटा 'मशीन लर्निंग' (मशीनचे आधुनिक तंत्रज्ञान) सिस्टीममध्ये टाकला जातो. हे तंत्रज्ञान सर्व माहितीचा अभ्यास करून प्रत्येक कुत्र्याची एक वेगळी ओळख आणि त्याचे संकेत निश्चित करते. यामुळे कुत्र्याने एखादा आजार हुंगल्यावर त्याच्या शरीरात नेमके काय बदल होतात, हे अगदी अचूकपणे समजणे सोपे होते.

३,००० रुग्णांवर यशस्वी चाचण्या!

या स्टार्टअपने कर्नाटकातील सहा रुग्णालयांसोबत भागीदारी केली असून, तब्बल ३,००० हून अधिक लोकांवर याच्या क्लिनिकल (वैद्यकीय) चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या बाबत एप्रिल महिन्यात 'जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी' या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकात त्यांचा एक विशेष अहवालही प्रसिद्ध झाला आहे. या यशस्वी चाचण्यांमधून हे सिद्ध झाले आहे की, केवळ माणसाचा श्वास हुंगून वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग (कॅन्सर) ओळखण्यात कुत्र्यांची घ्राणशक्ती कमालीची अचूक आणि उच्च दर्जाची आहे. या संशोधनाला वेग मिळण्यामागे एक रंजक कौटुंबिक कारणही आहे. या स्टार्टअपचे सह-संस्थापक आकाश कुलगोड यांच्या कुटुंबात तब्बल ११ डॉक्टर आहेत, ज्यांची त्यांना मोठी मदत झाली. या संपूर्ण वैद्यकीय अभ्यासाचे नेतृत्व आकाश यांचे काका हुबळी येथील 'रॅडऑन कॅन्सर सेंटर'चे प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ (ऑन्कोलॉजिस्ट) डॉ. संजीव कुलगोड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT