

Acidity Pills Risk: तुम्हाला सतत पित्ताचा त्रास होत असेल आणि त्वरित आराम मिळावा यासाठी रोज पित्तशामक गोळ्या घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... थोडा पित्ताचा त्रास झाला की घे गोळी या वृत्तीमुळं तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे असा इशारा एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पित्तावरच्या गोळ्या घेणे हानीकारक असून सध्याच्या घडीला पित्तावरच्या गोळांचा खप प्रचंड वाढला आहे. मात्र हे आरोग्यासाठी चांगलं नाहीये.
एम्स रूग्णालयातील डॉक्टर शालीमार यांच्या मते जर एखादा रूग्ण दीर्घकाळ गॅस आणि अॅसिडिटीची औषधे घेत असेल आणि तो जर आमच्याकडे आला तर त्याच्यामध्ये औषधाच्या अतीसेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यामुळं एखादं औषध सामान्य आहे म्हणून ते सतत घेणं योग्य नाही. ते औषध सतत घेतल्यामुळं रूग्णाचे आरोग्य बिघडते.
वैद्यकीय शास्त्रानुसार जर तुम्ही दीर्घकाळ अँटासिड औषधे घेत असाल तर तुमच्या शरीरातील कॅल्शियम आणि काही पोषक तत्वे यांच्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळं तुमची हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळं अशी हाडे लगेच तुटण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आधीपासूनच हाडांसंबंधी समस्या असेल तर धोका अधिक वाढतो.
डॉक्टर शालीमीर यांच्या मते दीर्घकाळ तुम्ही अँटासिड औषधे घेतली तर तुमच्या लंग्जवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं निमोनिया सारखे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळं अँटासिड औषधे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी. निमोनिया हा एक गंभीर आजार असून त्यात रूग्णाची स्थिती बिघडून त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.
दीर्घकाळ पोट रिकामे ठेऊ नका, थोड्या थोड्या वेळाने हलका आहार घ्या
मद्याचं सेवन टाळावे
फास्ट फूड, तेलकट मसालेदार जेवण कमी करावे
दररोज ३० मिनिटे व्यायाम करा, वेगाने चालणे
योग्य प्रमाणात पाणी प्या.
चांगली झोप गरजेची
डॉक्टरांच्या मते जर गॅस आणि पित्ताचा त्रास किंवा छातीत जळजळ ही समस्या सतत आणि दीर्घ काळापासून होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, यावर मेडिकलमधून गोळी आणून खाणे योग्य नाही. तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. या समस्यांना हलक्यात घेऊन त्याकडे दुर्लक्ष करू नका.