समस्या डेंटल अ‍ॅब्सेसची  (Pudhari File Photo)
आरोग्य

Dental Abscess | समस्या डेंटल अ‍ॅब्सेसची

दंत संसर्ग म्हणजेच दातांमध्ये होणारे जंतुसंसर्ग हे ओळखायला सोपे असले, तरी त्यांचे तत्काळ व्यवस्थापन करणे अनेकदा कठीण ठरते.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. निखिल देशमुख

दंत व्यवस्थापनामध्ये डेंटल अ‍ॅब्सेस किंवा पेरिअ‍ॅपिकल इन्फेक्शन यांचा समावेश होतो. हे प्रामुख्याने दातांची किड (डेंटर कॅरीज), दातांना झालेला आघात (ट्रॉमा) किंवा रूट कॅनॉल उपचार अपयशी ठरल्यामुळे होतात. जर याकडे दुर्लक्ष केले गेले, तर हे संसर्ग तीव्र वेदना देतातच; पण यापुढे जाऊन मानेला लागून असलेल्या भागात (डीप नेक स्पेस) किंवा कवटीतील सायनसपर्यंत पसरू शकतात. म्हणूनच योग्य वेळी तपासणी, उपचार गरजेचे ठरतात. यामुळे वेदनाशमन तर होतेच, शिवाय गंभीर गुंतागुंती टाळता येतात.

डेंटल अ‍ॅब्सेस बहुधा दातांची किड, दातांची स्वच्छता न राखणे, आघात किंवा अर्धवट आलेले अक्कलदाढ येणे यामुळे होतात. दातांच्या इनॅमलमध्ये भेग पडली की, तोंडातील जंतू पल्पमध्ये पोहोचतात आणि संसर्ग सुरू होतो. पल्पमधील जंतू दाताच्या मुळातून खाली जबड्यात किंवा वरच्या जबड्यात पसरतात. काही आनुवंशिक कारणे (उदा. अमेलोजेनेसिसची दोषपूर्ण रचना), दात घासण्याची सवय, तसेच धूम्रपान किंवा अमली पदार्थ हेही कारणीभूत असतात. दातांची किड ही सर्वत्र आढळणारी समस्या आहे. अमेरिकेत 20 ते 64 वयोगटांतील तब्बल 91% लोकांमध्ये दात किडलेले आढळले आहेत.

त्यातील जवळपास 27 टक्के लोकांनी उपचारच केलेले नाहीत. अशा लोकांमध्ये डेंटल अ‍ॅब्सेस होण्याचे प्रमाण जास्त असते. भारतात यापेक्षा स्थिती बरी असू शकते; पण यावरून समाजातील दंतआरोग्याबद्दलची उदासीनता आणि सामाजिक-आर्थिक घटकांचे महत्त्व स्पष्ट होते.

लक्षणे व तपासणी

रुग्ण तीव्र वेदना, दातांच्या स्वच्छतेची कमतरता, दाताला झालेला आघात, चेहर्‍यावर सूज, ताप, गिळण्यास त्रास, लसिका ग्रंथी सुजणे अशा लक्षणांसह येतात. मानसिक स्थितीत बदल किंवा श्वास घेण्यास त्रास दिसल्यास तातडीने उपाय करणे आवश्यक असते. डेंटल अ‍ॅब्सेस ओळखण्यासाठी एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यांचा उपयोग होतो. रक्त तपासणीत पांढर्‍या पेशींची संख्या वाढलेली दिसते.

उपचार

उपचारात अँटिबायोटिक्स, वेदनाशमन आणि संसर्ग झालेल्या दातावर योग्य उपाय (रूट कॅनॉल किंवा दात उपटणे) यांचा समावेश होतो. साध्या प्रकरणात तोंडावाटे दिलेली औषधे व दंतवैद्याकडे वेळेवर भेट पुरेशी ठरते. वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो, अन्यथा समस्या वाढून दात गमवावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT