आरोग्य

प्रत्येक श्वास महत्त्वाचा...!'CPR' हे जीवनरक्षक कौशल्य कसे शिकाल अन् जीव कसा वाचवाल?

CPR Awareness Week: प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असलेले जीवनरक्षक कौशल्य

मोनिका क्षीरसागर

Cardiopulmonary Resuscitation Awareness Week latest news:

अचानक हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आल्यास रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशावेळी, सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय करू शकता? याच ठिकाणी 'कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन' म्हणजेच CPR (Cardiopulmonary Resuscitation) या जीवनरक्षक कौशल्याचे महत्त्व सिद्ध होते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा 'गोल्डन पिरियड' (Golden Period) म्हणजेच मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी CPR अत्यंत आवश्यक आहे.

CPR म्हणजे काय?

CPR म्हणजे बंद पडलेले हृदय आणि श्वासोच्छ्वास तात्पुरते पूर्ववत करण्यासाठी केलेला प्रथमोपचार. जेव्हा हृदय अचानक थांबते, तेव्हा मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा थांबतो. रक्तप्रवाह थांबल्यामुळे काही मिनिटांतच मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. वेळेवर आणि योग्य पद्धतीने दिलेला CPR रक्ताभिसरण सुरू ठेवून मेंदूचे नुकसान टाळण्यास मदत करतो आणि रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता दुप्पट किंवा तिप्पट वाढवतो. आकस्मिक हृदयविकार, पाण्यात बुडणे, गुदमरणे किंवा विजेचा धक्का बसल्यास CPR ची गरज भासू शकते.

CPR ची मूलभूत पद्धत (प्रौढांसाठी):

प्रशिक्षण घेणे अनिवार्य असले तरी, आपत्कालीन परिस्थितीत खालील मूलभूत पायऱ्या त्वरित लक्षात ठेवल्या पाहिजेत:

१. प्रतिसाद तपासा: पीडित व्यक्तीला हळूवारपणे खांद्यावर टॅप करून मोठ्या आवाजात विचारा - "तुम्ही ठीक आहात का?" प्रतिसाद नसल्यास, लगेच मदतीसाठी (रुग्णवाहिका - १०८ किंवा कुटुंबातील सदस्यांना) कॉल करा.

२. छातीवर दाब (Chest Compressions): पीडित व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी (स्तनांच्या मध्यभागी) दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवून, कोपर सरळ ठेवत प्रति मिनिट १०० ते १२० वेळा वेगाने आणि खोलवर (सुमारे ५-६ सेमी) दाब द्या. दाब दिल्यानंतर छातीला पूर्णपणे पूर्वस्थितीत येऊ द्या.

३. श्वास (Rescue Breaths): जर तुम्ही प्रशिक्षित असाल, तर ३० दाब दिल्यानंतर तोंडाद्वारे दोन श्वास द्या (Mouth-to-Mouth Resuscitation). मात्र, प्रशिक्षित नसल्यास किंवा श्वास देण्यासाठी वेळ घालवायचा नसल्यास, केवळ छातीवर दाब देणे (Hands-Only CPR) देखील अत्यंत प्रभावी आहे.

४. सुरु ठेवा: व्यावसायिक वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत हे चक्र न थांबता सुरू ठेवा.

CPR हे एक 'जीवनरक्षक' कौशल्य

आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यावर, घरी किंवा कामाच्या ठिकाणी कोणालाही कधीही वैद्यकीय आणीबाणी येऊ शकते. CPR चे ज्ञान केवळ डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नसून, प्रत्येक नागरिकांसाठी एक आवश्यक 'जीवनरक्षक' कौशल्य आहे. हे कौशल्य शिकून तुम्ही केवळ अनोळखी व्यक्तीचाच नाही, तर तुमच्या जवळच्या व्यक्तीचाही जीव वाचवू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT