कोपनहेगन; पुढारी ऑनलाईन : डेन्मार्कचा फुटबॉलर ख्रिस्तीयन एरिक्सनची प्रकृती सुधार असल्याचे त्याचा एजंटने सांगितले. एरिक्सनला युरो कप फुटबॉलच्या सलामीच्या सामन्यातच ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यावेळी तो मैदानावच कोसळला होता. त्यानंतर डेन्मार्क आणि फिनलँडमधील सामना स्थगित करण्यात आला होता. अखेर डॉक्टरांनी त्याला सीपीआर ट्रिटमेंट देत त्याचे बंद पडलेले ह्रदय पुन्हा सुरु केले.
वाचा : 'आर. आश्विनला प्लॅनिंग करुन वाचवले!'
ज्यावेळी ख्रिस्तीयन एरिक्सन मैदानावर कोसळला त्यानंतर त्याची हालचाल बंद झाली होती. त्यामुळे त्याच्या संघ सहकाऱ्यांना काहीतरी विपरित घडले असल्याचे जाणवले. काही खेळाडूंच्या डोळ्याच अश्रूही आले होते. टीव्हीवर हे सर्व पाहणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना नेमके काय झाले तेच समजत नव्हते. डेन्मार्कच्या खेळाडूंनी मैदानावर एरिक्सनच्या भोवती गोल कडे केले होते. त्यामुळे त्याच्या आत काय चालले आहे हे काहीच समजत नव्हते. अखेर एरिक्सन जिवंत असल्याचे आणि त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आले.
या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल डेन्मार्क संघाचे डॉक्टर मॉर्टेन बोसेन यांनी माहिती दिली. त्यांनी डेन्मार्कच्या या मिडफिल्डरला ह्रदय विकाराचा झटका आल्याचे सांगितले. ते म्हणाले 'तो जवळपास गेलाच होता. आम्ही त्याला सीपीआर ट्रिटमेंट ( इलेक्ट्रिक शॉक ) दिले. आम्ही त्याला गमावण्याच्या किती जवळ होतो हे मला माहित नाही. पण त्याला एकदा शॉक दिल्यानंतर त्याचे ह्रदय पुन्हा सुरु झाले. याचा अर्थ आम्ही त्वरित उपचार केले.'
दरम्यान, एरिक्सनचा एजंट मार्टिन स्कूट्स यांनी 'मी त्याच्याशी रविवारी सकाळी बोललो. तो विनोद करत होता आणि चांगल्या मनस्थिती होता. माला तो बरा वाटला. त्याच्यासकट आम्हालाही सर्वांनाच त्याला अचानक काय झाले हे जाणून घ्यायचे आहे. डॉक्टर सध्या तेच शोधण्यासाठी त्याच्या खोलात जाऊन टेस्ट करत आहेत. याला थोडा वेळ लागेल.' अशी प्रतिक्रिया दिली.
वाचा : क्रोएशियाचा धक्कादायक पराभव, इंग्लंडकडून मात
ते पुढे म्हणाले की 'एरिक्सनला त्याच्या भोवती असलेल्या प्रेमाने उचलून धरले. त्याला जगभरातून संदेश येत आहेत. जवळपास अर्धे जग आमच्याशी संपर्कात आहे. सगळेजण चिंतेत होते. आता त्याने फक्त विश्रांती घेतली पाहिजे. त्याची पत्नी आणि आई वडील त्याच्या जवळ आहेत' स्कूट्स यांनी एरिक्सन मंगळवार पर्यंत रुग्णालयात देखरेखी खाली असणार आहे असे सांगितले.
डेन्मार्क फुटबॉल युनियनचे प्रवक्त्यांनी एरिक्सनची प्रकृती सध्या स्थीर असल्याचे सांगितले. ते म्हणाले 'तो अजून रुग्णालयात आहे, त्याची दिवसभर तपासणी सुरु होती. याच्या पलीकडे त्याच्या प्रकृतीबाबत अजून कोणतीही माहिती नाही.'