COVID-19 in pregnancy 
आरोग्य

गरोदरपणात COVID-19 झालेल्या मातांच्या मुलांना 'ऑटिझम'चा धोका अधिक; नवीन संशोधन

COVID-19 in pregnancy: गरोदरपणात कोविड-19 झालेल्या मातांच्या सुमारे २.७% मुलांना ऑटिझमचे निदान झाले

मोनिका क्षीरसागर

ज्या मातांना गरोदरपणात कोविड-19 चा संसर्ग झाला होता, त्यांच्या मुलांना ऑटिझम आणि इतर मज्जातंतू-विकासाचे विकार (neurodevelopment disorders) होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असू शकतो,असे एका महत्त्वाच्या संशोधनातील अभ्यासातून समोर आले आहे.

कोविड-19 झालेल्या २.७% मुलांना ऑटिझम

मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील (Massachusetts General Hospital) संशोधकांनी मार्च २०२० ते मे २०२१ दरम्यान जन्मलेल्या १८ हजारांहून अधिक बालकांच्या नोंदींचे विश्लेषण केले आहे. गरोदरपणात कोविड-19 संसर्ग झालेल्या मातांच्या मुलांमध्ये न्यूरो डेव्हलपमेंटल विकारांचे निदान होण्याची शक्यता १६% हून अधिक होती. म्हणजे, इतर जोखीम घटकांचा विचार केल्यानंतरही, धोका सुमारे १.३ पटीने जास्त आढळला. गरोदरपणात कोविड-19 झालेल्या मातांच्या सुमारे २.७% मुलांना ऑटिझमचे निदान झाले, तर इतरांमध्ये हे प्रमाण फक्त १.१% होते.

ऑटिझमचा जास्त धोका कोणाला ?

हा धोका मुलांमध्ये (boys) आणि ज्या मातांना गरोदरपणाच्या तिसऱ्या त्रैमासिकात (third trimester) संसर्ग झाला होता, त्यांच्यात अधिक स्पष्टपणे दिसून आला. तिसरे त्रैमासिक हे मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे मानले जाते. संशोधकांच्या मते, या निष्कर्षांना जैविक आधार आहे. संसर्ग गर्भापर्यंत थेट न पोहोचताही, आईच्या शरीरातील प्रतिकारशक्तीच्या प्रतिसादांमुळे (maternal immune responses) गर्भाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, असे नवीन संशोधन अभ्यासातून समोर आले आहे.

संशोधकांनी दिला महत्त्वाचा सल्ला

अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. लिडिया शुक म्हणतात की, पालकांना या संभाव्य धोक्याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना त्यांच्या मुलांसाठी योग्य तपासणी आणि उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील. संशोधक डॉ. अँड्रिया एडलो यांनी या निष्कर्षांवर जोर दिला आहे की, कोविड-19 इतर संसर्गांप्रमाणेच, केवळ आईसाठीच नाही तर गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठीही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे गरोदरपणात कोविड-19 संसर्ग टाळण्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT