

लंडन : सर्वसाधारणपणे अॅलर्जीसाठी वापरण्यात येणारा नाकाचा स्प्रे (नोजल स्प्रे) कोव्हिड-19 संसर्गाचा धोका दोन-तृतीयांशने कमी करतो. या स्प्रेमुळे राइनोव्हायरसच्या संसर्गातही घट झाल्याचे आढळले आहे. संशोधकांच्या मते, अधिक अभ्यासांनंतर हा स्प्रे एक सोपा आणि कमी खर्चाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरला जाऊ शकतो, अशी माहिती सारलँड विद्यापीठाच्या संशोधनात पुढे आली आहे.
अॅलर्जीसाठी वापरला जाणारा नोजल स्प्रे, ‘झेलॅस्टीन’ चाचणीत कोव्हिड-19 आणि सामान्य सर्दीचा संसर्ग कमी करतो, असे सारलँड विद्यापीठातील इंटरनल मेडिसिन विभागाचे संचालक प्राध्यापक रॉबर्ट बाल्स यांनी सांगितले. या चाचणीमध्ये 450 सहभागींना दोन गटांमध्ये विभागले गेले. 227 लोकांच्या पहिल्या गटाने 56 दिवसांसाठी दिवसातून तीन वेळा झेलॅस्टीन नसल स्प्रेचा वापर केला, तर 223 लोकांच्या दुसर्या गटाने त्याच कालावधीत दिवसातून तीन वेळा प्लेसिबो स्प्रे वापरला.
प्रा. बाल्स यांनी चाचणीचा मुख्य निष्कर्ष स्पष्ट करताना सांगितले की, या निरीक्षण काळात, झेलॅस्टीन गटातील 2.2 टक्के सहभागींना एस-आरएस-सीओव्ही-2 (कोव्हिड-19) ची लागण झाली, तर प्लेसिबो गटात हे प्रमाण 6.7 टक्के होत, म्हणजे जवळजवळ तिप्पट. सर्व संसर्गांची पुष्टी पीसीआर चाचणीने करण्यात आली. या स्प्रेमुळे केवळ कोरोना संसर्गातच घट झाली नाही, तर झेलॅस्टीन गटात कमी लक्षणे असलेले कोरोना संसर्ग, एकूण श्वसन संसर्गाची कमी संख्या, आणि अनपेक्षितपणे राइनोव्हायरस संसर्गातही घट आढळली. राइनोव्हायरसमुळे सामान्य सर्दी होते. या गटातील केवळ 1.8 टक्के लोकांना राइनोव्हायरसचा संसर्ग झाला, तर प्लेसिबो गटात हे प्रमाण 6.3 टक्के होते.