Obesity File Photo
आरोग्य

Obesity Causes | सतत गोड खाल्ल्यामुळे वाढतो ओबेसिटीचा धोका

एकदा लठ्ठपणा शरीराला जडला, शरीर स्थूल बनले की मग त्याजोडीने मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे सोबतीला येतात.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. किरण जोशी

सतत गोड खाल्ल्यामुळे लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटीही वाढण्याचा धोका असतो. एकदा लठ्ठपणा शरीराला जडला, शरीर स्थूल बनले की मग त्याजोडीने मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे सोबतीला येतात. (Obesity Causes)

साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आहे. गोड पदार्थ खाण्याची आवड सर्वांनाच असते. त्यातून जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची भावना होत असते. काही लोक जेवणानंतर चमचाभर साखर किंवा गूळ खातात. त्याशिवाय गोड चहा, कॉफी आणि साखर घालून दूधही पितात. या सर्वांमुळे गोड खाण्याचे प्रमाण अधिक होते आणि शरीरात जास्त प्रमाणात साखरही जाते.

गूळ किंवा साखर दोन्हीमध्ये कॅलरी सारख्याच प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराचे नुकसानच होते. जास्त गोड खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता बळावते, हे आता सर्वश्रुत आहे. पण केवळ मधुमेहच नव्हे तर साखरेच्या किंवा गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे इतरही काही शारीरिक आजाराला आमंत्रण मिळते. (Obesity)

सुरकुत्या : अतिगोड खाल्ल्यास ती शरीरात रक्तात मिसळते आणि शरीरातील कोलेजेन आणि इलास्टिन दोन्हीत मिसळते. त्यामुळे त्वचा वयापेक्षा अधिक लवकर म्हातारी दिसू लागते. तसेच त्वचा कोरडी होते आणि तिला सुरकुत्याही पडतात.

सांध्यामध्ये वेदना : साखरेचे अतिसेवन केल्याने सांधेदुखीच्या आजाराने ग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो तसेच हाडे कमजोर होतात.

हृदयविकार : अतिगोड खाल्ल्यामुळे शरीरात चरबीचे किंवा मेदाचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाचे नुकसान होते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

तणाव आणि घाबरणे: शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्याने नैराश्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याशिवाय मेंदूच्या पेशी आणि स्मरणशक्ती यांचे नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा साखरेचे अतिसेवन केल्याने जीव घाबरा होणे आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात.

जास्त साखर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यात अडथळा येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत सर्दी, फ्लू आणि इतर व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. याशिवाय मिठाई सतत खाल्ल्याने हाडांवर दुष्परिणाम होतात. म्हणून तज्ज्ञ गोड कमी खाण्याचा सल्ला देतात. याखेरीज सतत गोड खाल्ल्यामुळे लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटीही वाढण्याचा धोका असतो.

एकदा लठ्ठपणा शरीराला जडला, शरीर स्थूल बनले की, मग त्याजोडीने मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे सोबतीला येतात. दातांच्या आरोग्यासाठीही अतिगोड पदार्थांचे सेवन हानिकारक ठरते. कमी वयात दातांच्या समस्या जडू द्यायच्या नसतील तर गोड पदार्थांपासून चार हात लांब राहणेच योग्य !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT