‘अलमट्टी’ची आगळीक कोल्हापूर-सांगलीच्या मुळावर!

अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे ओढवला महापूर; अलमट्टी आणि महापुराचा चौथ्यांदा प्रत्यय
कर्नाटकातील अलमट्टी धरण
कर्नाटकातील अलमट्टी धरण
Published on
Updated on
सुनील कदम

कोल्हापूर : कर्नाटकची पाण्याची अतिरिक्त हाव यंदाही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुरात लोटायला कारणीभूत ठरलेली दिसत आहे. मागचा अनुभव विचारात घेऊन कर्नाटकने जर अलमट्टीत वेळेपूर्वीच जादा पाणीसाठा केला नसता, तर महापुराचे हे संकट टाळता आले असते.

कर्नाटकातील अलमट्टी धरण
Almatti Dam | कोल्हापूर, सांगलीला दिलासा: अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविला

कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला कारणीभूत ठरते, याचा प्रत्यय 2005, 2019 आणि 2021 सालच्या महापुराच्या वेळी आलेला आहे. ‘साऊथ आशिया नेटवर्क ऑफ डॅम, रिव्हर्स अँड पीपल्स’ या संस्थेने आणि अनेक जलतज्ज्ञांनी इथल्या महापुराला अलमट्टीचे बॅकवॉटर कारणीभूत ठरत असल्यावर अनेकवेळा शिक्कामोर्तब केले आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ऑगस्टअखेर 513 मीटरपर्यंत मर्यादित ठेवल्याशिवाय इथला महापूर रोखला जाऊ शकत नाही. कारण, तिथून पुढे अलमट्टीतील पाणी पातळी जसजशी वाढत जाईल, तसतसे त्याचे बॅकवॉटर सांगली-कोल्हापूरकडे पसरायला सुरुवात होते. मात्र, कर्नाटक आपला हेका सोडायला तयार नाही. पावसाला सुरुवात झाली रे झाली की, अलमट्टीत येईल तेवढे पाणी अडवायला सुरुवात केली जाते. परिणामी, कोल्हापूर-सांगली महापुरात गटांगळ्या खाऊ लागते. याबाबतीत कर्नाटक सरकार कुणाचेच ऐकायला तयार नाही, असे दिसते.

साठ्याचे निकष धाब्यावर!

केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार कोणत्याही धरणामध्ये पाणीसाठा करण्याबाबत काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार 31 मे या तारखेला धरणाच्या पाणी साठवण क्षमतेच्या साधारणत: 10 टक्के एवढाच पाणीसाठा असायला हवा. 31 जुलैपर्यंत धरणामध्ये 50 टक्के पाणीसाठा करायचा आहे. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत 77 टक्के पाणीसाठा करायचा आहे. त्यानंतर 15 सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाझर या माध्यमातून ऑक्टोबरअखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असे नियोजन करण्याचे जल आयोगाला अपेक्षित आहे. मात्र, हे सगळे निकष कर्नाटकने गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरण
Almatti Dam, Kolhapur Floods | 'अलमट्टी'तून विसर्ग वाढवला, पण पूरस्थिती कायम

यंदाही कर्नाटकची मनमानी!

16 जुलैै 2016 रोजीच अलमट्टी धरणात 95.47 टीएमसी इतका पाणीसाठा करण्यात आला होता, तर पाणी पातळी होती 517.84 मीटर! याचा अर्थ केंद्रीय जल आयोगाच्या निकषापेक्षा जवळपास 35-40 टीएमसी जादा पाणीसाठा अलमट्टीत करण्यात आला होता. दै. ‘पुढारी’ने अलमट्टीतील या अतिरिक्त पाणीसाठ्याबाबत आवाज उठविल्यानंतर कर्नाटकने अलमट्टीतून प्रतिसेकंद 50 हजार ते 3 लाख क्युसेकने विसर्ग चालू केला; पण तोपर्यंत सगळीच गणिते विस्कटून गेली होती. पावसाचा जोर वाढला होता, कोयना-चांदोली आणि राधानगरीतून विसर्ग सुरू झाला होता. परिणामी, महापूर कोल्हापूर-सांगलीच्या गळ्याशी आला.

न्यायालयीन लढाई आवश्यक!

2005 साली अलमट्टी धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन पाणी साठवायला सुरुवात झाली आणि नेमक्या त्या वर्षापासूनच सांगली-कोल्हापूरला महापुराचा फास पडत गेलेला दिसतो. केंद्रीय जल आयोगाच्या निकषाप्रमाणे अलमट्टीत पाणीसाठा केला, तर महापुराचे संकट कधीच ओढवणार नाही; पण हे तत्त्वज्ञान कर्नाटकच्या गळी उतरत नाही. शिवाय, त्यांच्या या आगळिकीचा फक्त सांगली-कोल्हापूरलाच फटका बसतो, असेही नाही. ऐनवेळी अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागल्यामुळे कर्नाटकच्या विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यालाही महापुराचा तडाखा बसतो; पण नेहमीप्रमाणे कर्नाटक आपला हेकटपणा सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनही ठोस काही करायला तयार नाही. त्यामुळे आता न्यायालयीन पातळीवरूनच कर्नाटकला वेसन घालावी लागेल. त्याशिवाय सांगली-कोल्हापूरच्या महापुराचे संकट कायमस्वरूपी टाळले जाऊ शकत नाही.

अलमट्टीची उंची वाढली तर इथे जगबुडीच!

अलमट्टीतील पाण्याची पातळी 516 मीटरच्या पुढे गेली की, सांगली-कोल्हापूरच्या नाका-तोंडात पाणी जाऊ लागते आणि कर्नाटकला अलमट्टीची उंची आणखी पाच मीटरने वाढविण्याचे वेध लागले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन वर्षांपूर्वी तसे विधान केले होते. कर्नाटकातील विद्यमान सरकारचेही तसेच मत आहे; पण अलमट्टीची उंची आणखी 5 मीटरने म्हणजे साडेसोळा फुटांनी वाढल्यास सांगली-कोल्हापूर या दोन शहरांसह पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदीकाठावरील शेकडो गावांचे अस्तिवच कायमस्वरूपी पुसले जाण्याचा धोका आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची आणि त्यातील पाणीसाठ्याबाबत या भागातील नागरिक आणि राज्य शासनाने न्यायालयीन लढाई सुरू करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news