

किणी : गेली दहा दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे पेठवडगावचा जलाधार असणारा महालक्ष्मी तलाव शनिवारी (दि.२७) पुर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. तलाव भरल्यामुळे शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्याने नागरिक सुखावले आहेत.
तलाव पुर्ण क्षमतेने भरला की पुर्वेकडून पाणी बाहेर पडते. ज्या भागाकडून पाणी बाहेर पडते, तो भाग हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा असल्याने पाणी बाहेर पडले की सोंड फुटली असे म्हणतात. ही सोंड फुटली की वडगांव परिसरातील नागरिक तलावाकडे बघण्यासाठी धाव घेतात. यावर्षी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिकांच्यात समाधान व्यक्त होत आहे. सांडव्यावरून पाणी बाहेर पडतानाचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
वडगाव शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी १८९० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी शहराजवळ महालक्ष्मी तलाव बांधला.२१० एकरात हा तलाव आहे. तलावात ३१ फुट ३ इंच पाणीपातळी आहे. तलावाच्या इतिहासात १९७२ व २००२, २०१६, २०२३ साली हा तलाव पुर्णपणे कोरडा पडला होता. या तलावात कासारवाडी, तासगांव येथील डोंगरावरील पाणी ओढयाद्वारे येते. परंतू यावर्षी जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तलाव पाहिल्या टप्प्यातच पुर्णक्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत आहे.
दरम्यान महालक्ष्मी तलाव भरल्यानंतर पारंपरिक पुजन व ओटी भरणीचा कार्यक्रम माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पोळ, सुनिल हुक्केरी, उर्मिला उंडाळे, परवीन फकीर, कल्पना शिंदे, संगिता मिरजकर, राजाराम यादव, आप्पासाहेब पाटील, सुभाष पाटील, सुरज पाटील, प्रवीण पाटील, संजय सुर्यवंशी, विजय पन्हाळकर सचिन नायकवडी आदी उपस्थित होते.