Financial Stress Brain Ageing : पैशांची सतत असणारी चिंता केवळ तुमच्या खिशावरच नाही, तर तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करत असते. एका नव्या संशोधनातून असा धक्कादायक खुलासा झाला आहे की, दीर्घकाळ चालणाऱ्या आर्थिक संकटामुळे मानवी मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया (Brain Ageing) वेगाने वाढते.
ब्रिटनमधील २,७५९ लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांनी आयुष्यात सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना केला आहे, त्यांची ५३ व्या वर्षापर्यंतची बौद्धिक क्षमता आर्थिकदृष्ट्या स्थिर असणाऱ्या लोकांच्या तुलनेत बरीच कमजोर आढळली.
'युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन'चे संशोधक जॅक वेल्स यांनी सांगितले, "एखाद्या प्रसंगी आलेले आर्थिक संकट एवढे धोकादायक ठरत नाही; मात्र, अनेक वर्षे सतत टिकून राहिलेली गरिबी आणि आर्थिक विवंचना ही मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वांत घातक ठरते."
संशोधनानुसार, ज्यांनी आपल्या तरुणपणात आणि मध्यवयात सतत पैशांची अडचण किंवा अत्यल्प उत्पन्न सोसले आहे, त्यांची ५३ व्या वर्षी घेतलेल्या बौद्धिक चाचण्यांमध्ये कामगिरी खालावलेली दिसून आली. एवढेच नाही तर, वयाच्या ७१ व्या वर्षापर्यंत अशा व्यक्तींच्या मेंदूमध्ये लक्षणीय आकुंचन झाल्याचेही स्पष्ट झाले. वयाच्या ५३ ते ६९ दरम्यान त्यांच्या स्मरणशक्तीचा ऱ्हास मंदावलेला दिसला, ज्याचा अर्थ असा की मध्यवयापर्यंत त्यांच्या मेंदूची मोठी हानी आधीच झालेली होती.
तज्ज्ञांच्या मते, सततच्या आर्थिक संकटामुळे मेंदूवरील ताण वाढतो. यामुळे लक्ष केंद्रित करणे आणि निर्णय घेणे यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी मेंदूला मिळणारी ऊर्जा कमी पडू लागते. हा दीर्घकालीन मानसिक ताण मेंदूच्या कार्यप्रणालीवर आघात करतो आणि हळूहळू मेंदूची कार्यक्षमता कायमची मंदावते. तसेच तसेच, पुरुष, बालपणी गरिबी अनुभवलेले लोक आणि अल्झायमरचा जनुकीय (Genetic) धोका असलेल्या व्यक्तींमध्ये आर्थिक ताणाचा मेंदूवर होणारा हा वाईट परिणाम अधिक वेगाने दिसून आला आहे.
वाढत्या वयानुसार मेंदूची क्षमता कमी होणे किंवा 'डीमेन्शिया' (स्मृतीभ्रंश) यांसारखे आजार टाळायचे असतील, तर आर्थिक अड अडचणींना 'दीर्घकालीन' रूप घेण्यापासून रोखणे गरजेचे आहे. २०१९ मधील आकडेवारी: जगभरात ५.७ कोटी लोक डीमेन्शियाने ग्रस्त होते. २०५० पर्यंतचा अंदाज: ही संख्या तिप्पट होऊन तब्बल १५ कोटींवर पोहोचण्याची भीती आहे.
मेंदूचा ऱ्हास रोखण्यासाठी बदलता येण्यासारख्या घटकांवर संशोधक भर देत आहेत. सध्या जगभरात वाढत्या महागाईमुळे कोट्यवधी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा वेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे किती गरजेचे आहे, हेच या अभ्यासातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका प्रवीथा पाताल्या यांनी म्हटलं आहे की, "आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आधार देणे आणि दीर्घकालीन गरिबी कमी करणे, यांमुळे भविष्यातील स्मृतीभ्रंश आणि मेंदूच्या आजारांना रोखण्यात मोठी मदत होऊ शकते."