Childhood Sugar Intake Anxiety Risk Study : आयुष्यातील पहिले १,००० दिवस हे मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि या टप्प्यावर मिळणाऱ्या पोषणामुळे मेंदूच्या रचनेत कायमस्वरूपी बदल घडू शकतात. एका नवीन अभ्यासानुसार, आयुष्यातील पहिल्या १,००० दिवसांत म्हणजेच गर्भधारणेपासून ते साधारण अडीच वर्षांच्या वयापर्यंत साखरेचे सेवन केल्याने प्रौढावस्थेत चिंता (anxiety) वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
लहानपणी साखरेचे सेवनाचा मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक वर्षांनंतर चिंता वाटण्याची शक्यता वाढू शकते, असे या अभ्यासातून दिसून आले आहे. 'युरोन्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, बालपणात साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवल्याचा संबंध गोड पदार्थांची आवड, मानसिक आरोग्य आणि मेंदूची रचना यांमधील फरकांशी असल्याचे दिसून आले.
'ट्रान्सलेशनल सायकियाट्री' नियतकालिकात नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे. यानुसार, सरे विद्यापीठातील संशोधकांनी १९५१ ते १९५६ या काळात जन्मलेल्या ४५,००० हून अधिक लोकांच्या वैद्यकीय माहितीचे विश्लेषण केले. हा काळ दुसर्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात ब्रिटनमध्ये साखरेच्या मर्यादित वाटपाची (रेशनिंगची ) अंमलबजावणी करण्यात आली होती. १९४० ते १९५३ या काळात लागू असलेल्या या निर्बंधांमुळे प्रौढांसाठी साखरेचा वापर दिवसाला साधारण ४० ग्रॅम इतका मर्यादित करण्यात आला होता.
गर्भावस्था आणि जन्मानंतर ६, १२, १८ किंवा २४ महिन्यांच्या (दोन वर्ष) वयापर्यंत सरकारच्या साखर रेशनिंग निर्बंधांचा प्रभाव होता, त्यांची अशा लोकांशी तुलना करण्यात आली ज्यांना निर्बंध नव्हते म्हणजे त्यांनी अधिक साखरेचे सेवन केले. ज्यांनी साखर निर्बंधाचा सामना केला होता त्यांना गोड पदार्थांची आवड कमी असल्याचे संशोधनात आढळले. तसेच त्यांना प्रौढावस्थेत चिंता (anxiety) होण्याचा धोका ३३ टक्क्यांनी कमी असल्याचेही स्पष्ट झाले.
साखर निर्बंधांच्या काळात जीवन व्यतीत केलेल्यांमध्ये चिंता आणि नैराश्य (depression) या समस्या नंतरच्या वयात उद्भवल्या. ज्यांच्यावर दीर्घकाळ निर्बंध लागू होते, त्यांच्यामध्ये वयाच्या ६२ व्या वर्षाच्या सुमारास चिंता दिसून आली; तर साखर निर्बंधाचा सामना न केलेल्यामध्ये ती वयाच्या ५५ व्या वर्षी दिसून आली.
"निर्बंध उठवल्यानंतर सहभागी व्यक्तींच्या साखरेच्या वापरात वाढ झाली असली, तरीही सुरुवातीच्या काळातील आहाराशी संबंधित परिस्थितीचे मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे दिसून येते," असे सरे विद्यापीठातील प्राध्यापिका आणि या अभ्यासाच्या वरिष्ठ लेखिका नोफर गेफमन यांनी म्हटलं आहे. संशोधकांच्या असे लक्षात आले की, निर्बंध उठवल्यानंतर साखरेचा वापर वेगाने वाढला, परंतु सुरुवातीच्या काळात साखर मर्यादित ठेवल्याचे परिणाम मात्र अनेक दशके टिकून राहिले.
मानवाच्या जन्मानंतरची आयुष्यातील पहिले १,००० दिवस हे मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या टप्प्यावर मिळणाऱ्या पोषणामुळे मेंदूच्या रचनेत कायमस्वरूपी बदल घडू शकतात, असे संशोधकांनी नमूद केले आहे.
संशोधकांनी उल्लेख केलेल्या पूर्वीच्या संशोधनानुसार, साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे 'सेरोटोनर्जिक न्यूरॉन्स'ची घनता आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते; हे न्यूरॉन्स मनस्थिती (मूड) नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. संशोधकांच्या मते, सुरुवातीच्या काळात साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवल्यास या मज्जासंस्थेच्या मार्गांचे संरक्षण होऊ शकते.