Cholesterol file photo
आरोग्य

LDL Cholesterol: खराब कोलेस्ट्रॉलमुळे कमी होतंय आयुष्य; भारत अन् चीनमध्येच जगातील ३३% प्रमाण, पाहा संशोधनातील धक्कादायक माहिती

बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वाढणारे खराब कोलेस्ट्रॉल हे जगभरातील आरोग्यासाठी गंभीर आव्हान बनले आहे.

मोहन कारंडे

LDL Cholesterol

नवी दिल्ली : बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वाढणारे खराब कोलेस्ट्रॉल हे जगभरातील आरोग्यासाठी गंभीर आव्हान बनले आहे. नव्या संशोधनानुसार, उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉलचा जागतिक भार सर्वाधिक भारत आणि चीनमध्ये असून, जगातील सुमारे ३३ टक्के प्रकरणे या दोन देशांमध्ये आढळतात. २०२३ मध्ये केवळ उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे ३६ लाख मृत्यू झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

निरोगी आयुष्याची वर्षे गमावली

एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा चरबीयुक्त घटक असून तो रक्तवाहिन्यांमध्ये साचत जातो. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी १०० मिलिग्रॅम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी असणे योग्य मानले जाते.

संशोधनानुसार, २०२३ मध्ये उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे जगभरात ३६ लाख लोकांचा मृत्यू झाला. हे एकूण मृत्यूंपैकी सुमारे ६ टक्के आहे. याशिवाय, सुमारे ९.०७ कोटी निरोगी आयुष्याची वर्षे गमावली गेली. विशेष म्हणजे, जागतिक एलडीएल कोलेस्ट्रॉलच्या एकूण भारापैकी जवळपास एक तृतीयांश वाटा भारत आणि चीनचा आहे.

लोकसंख्या वाढ आणि वृद्धत्वामुळे संकट अधिक गंभीर

जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात १९९० नंतर एलडीएल कोलेस्ट्रॉलचा एकूण भार सातत्याने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोकसंख्या वाढ, वाढते सरासरी वय आणि सामाजिक-आर्थिक बदल हे या वाढीमागील प्रमुख घटक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

१९९० पासून एलडीएलचा भार वाढताच

वयानुसार प्रमाणित दरात काही प्रमाणात घट झाली असली, तरी एकूण एलडीएल कोलेस्ट्रॉलचा भार १९९० पासून वाढत असल्याचे संशोधनात दिसून आले. संशोधकांनी जीडीबी २०२३ (Global Burden of Disease) मधील आकडेवारीचा वापर करून १९९० ते २०२३ या कालावधीत २०४ देशांतील २५ वर्षांवरील प्रौढांमध्ये उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार, १९९० मध्ये २५ वर्षांवरील सुमारे २.५ अब्ज प्रौढांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी ५४ मिलिग्रॅम प्रति डेसीलिटर किंवा त्याहून अधिक होती. २०२३ पर्यंत ही संख्या वाढून ४.६ अब्जांवर पोहोचली आहे.

या देशांत सर्वाधिक आणि सर्वात कमी एलडीएल

२०२३ मधील आकडेवारीनुसार, बुर्किना फासो, लेसोथो, सोमालिया आणि रवांडा येथे एलडीएल कोलेस्ट्रॉलची सरासरी पातळी सर्वात कमी (८० मिलिग्रॅम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी) नोंदवली गेली. तर सर्बिया, स्लोव्हेनिया, रशिया, नॉर्वे आणि ऑस्ट्रिया येथे ती सर्वाधिक (१३५ मिलिग्रॅम प्रति डेसीलिटरपेक्षा जास्त) आढळली. संशोधनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, २०२३ मध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल हा दुसऱ्या क्रमांकाचा घटक ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT