Acidity Yoga
नवी दिल्ली: बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा आणि मानसिक ताणतणाव यामुळे आजकाल अम्लपित्त, छातीत जळजळ आणि 'ॲसिड रिफ्लक्स' या समस्या सामान्य झाल्या आहेत. अनेकजण या त्रासाला रोजच्या जगण्याचा भाग मानून त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तात्पुरत्या गोळ्या घेऊन वेळ मारून नेतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, पचनाच्या या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यावर मात करण्यासाठी औषधांशिवाय योगासने आणि प्राणायाम हा एक प्रभावी व नैसर्गिक मार्ग ठरू शकतो.
दिल्लीतील 'उनालोम योगा अँड वेलनेस स्टुडिओ'च्या संस्थापिका आणि योगतज्ज्ञ रिया व्यास यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्यांनी ॲसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक विशेष प्राणायाम आणि आसन सुचवले आहे.
रिया व्यास यांच्या मते, शरीरातील 'ईडा नाडी' (जी शीतलता आणि शांततेचे प्रतीक आहे) सक्रिय केल्यास पचनसंस्था शांत होते आणि वाढलेले पित्त कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेला 'चंद्रभेदी प्राणायाम' असे म्हणतात. हा प्राणायाम शरीरातील अतिरिक्त ॲसिड नैसर्गिकरित्या संतुलित करतो.
१. जमिनीवर ताठ बसून किंवा शक्य असल्यास वज्रासनात बसा. पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी तुम्ही उशीचा आधार घेऊ शकता.
२. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा.
३. आता डाव्या नाकपुडीने हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या.
४. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा.
५. हे चक्र ५ ते १० वेळा करा. सवय झाल्यावर तुम्ही २ ते ३ मिनिटे हा सराव करू शकता.
योगामध्ये वज्रासन हे एकमेव असे आसन आहे जे जेवणानंतर लगेच करता येते. रिया सांगतात की, वज्रासनामुळे ओटीपोटाच्या भागातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुलभ होते. जेवणानंतर ५-१० मिनिटे वज्रासनात बसल्याने पोट फुगणे आणि गॅस होण्याच्या समस्या कमी होतात. "हा केवळ लक्षणांवर उपचार नसून, आपल्या शरीराला शांतपणे अन्न पचवण्याची सवय लावण्याचा प्रयत्न आहे. जर तुम्हाला ॲसिडिटी होणे ही सामान्य बाब वाटत असेल, तर तसे नाही. छोट्या बदलांनी तुम्ही दीर्घकालीन आराम मिळवू शकता," असे रिया व्यास यांनी सांगितले आहे.
केवळ प्राणायाम करून चालणार नाही, तर आपल्या रोजच्या सवयींकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ॲसिडिटी मुळापासून नष्ट करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
जेवणाची वेळ नियमित ठेवा
अति खाणे टाळा
पचायला हलके आणि संतुलित अन्न निवडा
नियमित शारीरिक हालचाल ठेवा