पुढारी ऑनलाइन डेस्क : Fashion Trend in Sari : भारतीय पेहारावातील साडीची शान काही वेगळीच आहे. मुख्य म्हणजे साडी नेसणे कधीही आऊट ऑफ फॅशन नाही. फक्त साडीचे ट्रेंडस् बदलताना पाहायला मिळतात. हल्ली साड्यांमध्ये स्ट्राईप्सची फॅशन आली आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्रीसुद्धा स्ट्राईप्ड प्रिंटच्या साड्या वापरतात. या फॅशनची एक सकारात्मक बाजू म्हणजे या साड्या नेसल्यास स्लीम लूक मिळतो. प्रसंगानुरूप किंवा कार्यक्रमानुरूप आपल्या आवडीनुसार ही साडी वापरू शकता. ग्रेसफुल दिसण्यासाठी या साड्या नक्कीच चांगला पर्याय आहेत.
डिझाईन, रंग आणि वैविध्य : हल्ली साड्यांमध्ये अनेक प्रकारच्या स्ट्राईप्स प्रिंटस् आल्या आहेत. काही साड्या अशाही असतात की, त्यामध्ये साडीच्या दर्शनी भागावर स्ट्राईप्स असतात; पण पदर साधा, विनापट्ट्यांचा असतो. शरीर ठेवणीवर कोणत्या प्रकारच्या स्ट्राईप्स चांगल्या दिसतील त्यानुसार साडीची खरेदी करा. रंगाबाबत बोलायचे, तर उठावदार रंगांची सध्या चलती आहे. त्यामुळे हिरवा, निळा, पिवळा यासारखे रंग निवडू शकता.
पट्टेरी साड्या विविध फॅब्रिकमध्ये मिळतात. पूर्वी काही विशिष्ट कापडावरच पट्ट्या-पट्ट्यांचे डिझाईन असायचे. आकर्षक लूक मिळवण्यासाठी सुती, लिननच्या साड्या चांगला पर्याय ठरतो. लग्नादी समारंभाकरिता स्ट्राईप्स प्रिंटच्या साड्या वापरायच्या असतील, तर सिल्कमध्ये असे प्रिंट मिळतात. या साड्यांमुळे सण-समारंभात थोडा वेगळा लूक मिळेल.
स्ट्राईप्स असलेल्या साड्यांची खासियत म्हणजे त्या कोणत्याही वयाच्या मुलींना, स्त्रियांना चांगल्या दिसतात. मात्र, या साड्या नेसून वावरताना काही गोष्टींबाबत सजग राहा. मध्यमवयीन असाल तर स्ट्राईप प्रिंटबरोबर पूर्ण बाह्यांचा ब्लाऊज घाला. याउलट तरुणींनी बिनबाह्यांचा अर्थात स्लिव्हलेस ब्लाऊज वापरावा.
हे ही वाचा :