Latest

Farmers Protest | ‘चलो दिल्ली’ मोर्चा : अश्रुधुरामुळे आतापर्यंत ६ शेतकऱ्यांचा मृत्यू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाला १५ दिवस उलटले असून आतापर्यंत ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीकडे कूच करत असलेल्या शेतकर्‍यांना शंभू सीमेवर रोखण्यासाठी पोलिसांकडून २१ फेब्रुवारी रोजी अश्रुधुरासह रबरी गोळ्या आणि पाण्याच्या फवार्‍यांचा वापर करण्यात आला होता. यामुळे पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील अर्नो गावातील अल्पभूधारक शेतकरी कर्नैल सिंग (वय ६२) यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. मंगळवारी मध्यरात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा करावा यासह शेतकर्‍यांची सर्व कर्जे माफ करावीत, या आपल्या प्रमुख मागण्यांसाठी प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकर्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरासह रबरी गोळ्या आणि पाण्याच्या फवार्‍यांचा वापर करण्यात येतो. या धुमश्चक्रीत आतापर्यंत एका युवा शेतकर्‍यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनात मृत्यू झालेले पंजाबमधील शेतकरी कर्नेल यांचा धाकटा मुलगा गुरप्रीत सिंग (वय २८) याने सांगितले की, त्याचे वडील १३ फेब्रुवारीला धरणे धरण्यासाठी गेले होते. आम्ही त्यांना घरी येऊन एक दिवस विश्रांती घेण्यास सांगितले, तरीही ते परतले नाहीत. २१ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. अश्रुधुराचा श्वास घेतल्याने त्यांना त्रास होत होता. आंदोलनाच्या ठिकाणी उभारलेल्या वैद्यकीय मदत केंद्रामधून ते औषधे घेत होते. आजारी असतानाही ते घरी परतले नाहीत. सोमवारी सकाळी त्यांना पाटणच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेथील डॉक्टरांनी त्यांना राजिंद्र मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नेल यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. ते दीड एकर शेती करत होते. त्यांच्यावर सुमारे ८ लाख रुपयांचे कर्ज आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT