पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचा फेक व्हिडिओ (Fake Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते कथितपणे "भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तर आम्ही असंवैधानिक एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण हटवू" असे म्हणत आहेत. या बनावट व्हिडिओबाबत भाजप आणि गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर नोंदवला आहे. शहा यांच्या एडिट केलेल्या व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांना २ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये एक तक्रार भाजपने केली होती, तर दुसरी तक्रार गृह मंत्रालयाने केली होती. तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल सायबर विंग IFSO युनिटने एफआयआर नोंदवला आहे. भाजपने या फेक व्हिडिओबाबत देशभरात एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे समाजातील मागास घटकांसाठीचे आरक्षण भाजपला संपवायचेच असते तर भाजपने कधीच तसे केले असते. पण तसे भाजपला पुढेही करायचेच नाही. उलट '400 पार'चे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर राज्यघटना व आरक्षण अधिक मजबूत होणार आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण न देण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूलभूत तत्त्वच तुष्टीकरणाचे धोरण डोळ्यासमोर ठेवून उलथवून टाकण्याचा काँग्रेसचाच डाव आहे, असा पलटवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केला.
मागास घटकांच्या हक्कांत कपात करून धार्मिक आधारावर आरक्षण देण्याचा कट काँग्रेसने रचलेला आहे. मात्र भाजप आहे, तोवर हा कट कधीही यशस्वी होणार नाही, हे काँग्रेसला माहिती आहे. त्यामुळेच या पक्षाचे नेते राहुल गांधी हे, भाजप आरक्षण रद्द करू इच्छिते, भाजपला राज्यघटनाच रद्दबातल ठरवायची आहे, अशी देशातील मागास समाजाची दिशाभूल करत असतात, असे शहा म्हणाले.
हेही वाचा :