Latest

नगरमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट खवा जप्त, गुजरातमधून आयात

दीपक दि. भांदिगरे

मिठाई व खवा तयार करण्यासाठी वापरले जाणारे बनावट व आरोग्यास हानिकारक असलेले पदार्थ असा बनावट खव्याचा मोठा साठा नगर शहरात जप्त करण्यात आला. गुजरात राज्यातून आलेला हा सुमारे दीड टन माल अन्न व औषध प्रशासन विभागाने सक्कर चौकातील एका पार्किंगमध्ये एका ट्रॅव्हल बसमधून जप्त केला. ऐन दिवाळीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट मिठाई तयार करण्याच्या पदार्थांचा साठा जप्त झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली.

दिवाळीच्या तोंडावर मिठाई व रेडिमेड फराळासाठी मोठी मागणी असते. यात मिठाई तयार करण्यासाठी हलक्‍या प्रतीचा व आरोग्यास हानीकारक पदार्थांचा समावेश असलेला माल गुजरातमधून आयात करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. 30-30 किलोच्या बॅगमध्ये सुमारे दोन हजार किलोचा हा माल असल्याचा प्राथमिक अंदाज असून दुपारी उशिरापर्यंत याची मोजणी सुरू होती. विशेष म्हणजे, नगर शहरातील चार जणांनी या मालाची मागणी केली असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून समोर आले आहे. आरोग्यास हानिकारक पदार्थ यात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच हा माल नष्ट करण्यात येणार असून दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे यांनी सांगितले. सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार, प्रदीप कुटे, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, सदर मालाची रितसर खरेदी केली आहे. आम्ही मालाची खरेदी करुन विक्री करतो, त्याचे ते काय करतात, याच्याशी आमचा काय संबंध? असा सवाल सदर माल खरेदी करणाऱ्यांकडून कारवाई वेळी करण्यात आला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : खुसखुशीत खमंग चकली रेसिपी आणि टिप्स | Chakli Recipe

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT