नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – नवी दिल्ली रेल्वे स्थानकात रेल्वे गाड्या मोजण्याच्या कामाची भरती निघाली आहे, असे सांगून नोकरीच्या नावाखाली 2.68 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तामिळनाडूतील तब्बल 28 जणांना या टोळीने गंडा घातल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते.
मूळचा तामिळनाडूतील कोईमतूरचा रहिवासी असलेल्या व्ही. शिवरामन याला या प्रकरणी महादेव मार्ग परिसरात अटक करण्यात आली. त्याचा साथीदार विकास राणा याला प. बंगालमधील दार्जिलिंग येथून अटक करण्यात आली आहे. राणा हा दिल्लीतील गोविंदपुरीचा रहिवासी आहे. शिवरामन हा फ्रीलान्सर म्हणून दिल्लीत वावरत होता. राणा हा नॅशनल म्युझियम फॉर नॅचरल हिस्ट्रीमध्ये शिक्षण सहाय्यक म्हणून काम करत होता. गेल्या मार्च त्याने हे काम सोडले होते.
आर्थिक गुन्हे शाखेची तीन पथके रेल्वे भरती फसवणूक प्रकरणाचा तपास करीत होती. बिहारचा रहिवासी असलेला सत्येंद्र दुबे हा या प्रकरणाचा मूळ सूत्रधार आहे. उत्तम नगर भागात राहणारा दुबे तसेच त्याचा जोडीदार राहुल चौधरी हे अद्यापही फरार आहेत.
हेही वाचा :