पुढारी ऑनलाईन डेस्क : ते एका देशाचे माजी पंतप्रधान. उतार वयात ते प्रेमात पडले; पण त्यांनी तरुण गर्लफ्रेंडशी लग्न केले नाही. मात्र अखेरच्या श्वास घेताना त्यांनी तिला पत्नी म्हणून हाक मारली. तिचे स्मरण करतच त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली. या नात्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. आता चर्चा सुरु आहे त्यांच्या मृत्यूपत्राची. कारण त्यांनी तब्बल ९०६ कोटी रुपयांची संपत्ती आपल्या गर्लफ्रेंडच्या नावावर केली आहे, असे वृत्त 'द गार्डियन'ने दिले आहे. जाणून घेवूया इटलीचे दिवंगत पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी ( Ex-Italian PM Silvio Berlusconi ) यांच्या संपत्ती आणि त्यांची गर्लफ्रेंड मार्टा फसिना यांच्याविषयी….
सिल्वियो बर्लुस्कोनी हे इटलीतील माध्यम सम्राट आणि राजकारणी होते. त्यांनी फोर्झा इटालिया या राजकीय पक्षाची स्थापना १९९४ मध्ये केली. त्यांनी तीनवेळा इटलीचे पंतप्रधान पद भूषवले होते. ते १९९४ मध्ये प्रथमच इटलीचे पंतप्रधान झाले. त्यानंतर २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा संभाळली. २००८ मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता काबीज केली. मात्र कर्जाच्या संकटामुळे त्यांना २०११मध्ये त्यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले. २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला. मात्र काही काळानंतर ते राजकारणापासूनही दूर झाले. त्यांचा पक्ष फोर्झा इटालिया इटालियन सरकारमध्ये सहयोगी आहे. इटलीच्या राजकारणातील 'किंगमेकर' अशीही सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांची ओळख होती.
बर्लुस्कोनी यांचे नाव अनेक वादांशी जोडले गेले होते. एसी मिलान या प्रसिद्ध फुटबॉल क्लबचेही ते मालक होते. २०१३ मध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये त्याचे नाव आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि कर हेराफेरीचेही आरोप झाले होते. बर्लुस्कोनी यांच्या नावावर 6 अब्ज युरोपेक्षा अधिक संपती आहे.
इटलीमध्ये २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात मार्टा फसिना कनिष्ठ सभागृहाच्या सदस्या झाल्या. २०२० मध्ये त्यांची बर्लुस्कोनी यांच्याशी ओळख झाली. तेव्हा बर्लुस्कोनी ८३ वर्षांचे होते तर मार्टा ३० वर्षांच्या होत्या. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले;पण दोघांनी कायदेशीर लग्न केले नव्हते. मात्र अखेरच्या क्षणात मार्टा या बर्लुस्कोनी यांच्या बरोबर होत्या. बर्लुस्कोनी यांचे जून २०२३ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आता त्याचे मृत्यूपत्र चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात ३३ वर्षीय गर्लफ्रेंड मार्टा फासिना यांच्यासाठी १०० मिलियन युरो म्हणजेच ९०६ कोटी रुपये सोडले आहेत.
सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांनी आपली गर्लफ्रेंड मार्टा फासिना हिला ९०६ कोटी रुपये दिले आहेत. तसेच त्यांनी आपल्या मरीना आणि पिअर सिल्व्हियो या दोन्ही मुलांना संपत्तीमधील ५३ टक्के हिस्सा दिला आहे. याशिवाय बर्लुस्कोनी यांनी आपल्या मृत्यूपत्रात भाऊ पाओलोसाठी १०० दशलक्ष युरो आणि फोर्झा इटालिया पक्षाचे माजी खासदार मार्सेलो डेल'उत्रीसाठी ३०दशलक्ष युरो देण्यात यावे, असे म्हटले आहे.
हेही वाचा :