Latest

“भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे” : मोहन भागवत यांचे मोठे विधान

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती 'हिंदू' आहे. कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही. सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मंगळवारी छत्तीसगढमधील सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भागवत म्हणाले की, 'विविधतेतील एकता हे भारताचे जुने वैशिष्ट्य आहे. हिंदुत्व ही जगातील एकमेव कल्पना आहे, जी सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. आम्ही १९२५ पासून सांगत आहोत की, भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे लोक भारताला आपली मातृभूमी मानतात आणि विविधतेत एकतेची संस्कृती घेऊन जगू इच्छितात किंवा या दिशेने प्रयत्न करू इच्छितात, ते कोणत्याही संस्कृतीचे असू देत, कोणतीही भाषा बोलू देत, खाद्य सवयी आणि विचारसरणी कोणतीही असू दे, पूजा कोणत्याही पद्धतीने करू देत, ते सर्व हिंदू आहेत', असे भागवत यांनी म्हटले आहे.

प्रत्येक भारतीयाचा DNA सारखाच

'आपले पूर्वज समान होते. ४० हजार वर्षे जुन्या अखंड भारताचा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा DNA सारखाच आहे. प्राचीन भारतातील भूभागावर राहणाऱ्या लोकांचे पूर्वज सारखेच आहेत. आपल्या पूर्वजांनी आपल्या आपल्या पूजेच्या पद्धती जोपासाव्यात हेच शिकवले आहे. प्रत्येकाने आपली श्रद्धा जोपासावी पण इतरांच्या श्रद्धा बदलण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक मार्ग एका सामान्य ठिकाणी घेऊन जातो', असेही ते म्हणाले.

'संपूर्ण जगात हिंदुत्व ही एकमेव कल्पना आहे जी विविधतेला एकत्र आणण्यावर विश्वास ठेवते. या देशात हजारो वर्षांपासून विविधतेला एकत्र आणले आहे. आपली संस्कृती आपल्याला जोडते. आपण आपापसात कितीही भांडलो तरी संकटाच्या वेळी आपण एकरूप होतो. जेव्हा देशावर काही संकटे येतात तेव्हा आम्ही एकत्र लढतो. कोरोना सर्व देशभर पसरला तेव्हा संपूर्ण देश एकजुटीने उभा राहिला', असे भागवत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT