नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतात यावर्षी आयसीसी वन-डे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ही स्पर्धा पार पडेल. 2011 नंतर भारतीय भूमीवर होत असलेल्या या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघ पुन्हा एकदा पटकावेल का याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. या स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार्या तज्ज्ञ फलंदाजाची कमतरता भासत आहे. युवराजसिंग निवृत्त झाल्यापासून ही समस्या सुरूच आहे. 2019 चा वर्ल्डकप तर चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटला नसल्यामुळे आपण हरलो, असे पोस्टमार्टेमही आपण करून रिकामे झालो, पण आता 2023 चा वर्ल्डकप तोंडावर आला असतानाही यावर तोडगा निघालेला नाही. (Team India)
जेव्हा जेव्हा आयसीसी वन-डे वर्ल्डकप 2019 चा उल्लेख केला जातो तेव्हा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला दोन गोष्टी निश्चितच त्रास देतात त्या म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध धावबाद होणे आणि दुसरे म्हणजे नंबर-4 वर फलंदाजी करणार्या तज्ज्ञ फलंदाजांची कमतरता. (Team India)
2019 च्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली तीच धक्कादायक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या संघात अंबाती रायुडूला स्थान मिळाले नाही जो नंबर-4 वर फलंदाजी करण्याचा प्रमुख दावेदार होता. त्याआधी दोन वर्षे आपण त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवत होतो, पण त्याच्या जागी भारतीय निवड समितीने विजय शंकरची त्रिमितीय खेळाडू म्हणून निवड केली. खरेतर हाच सर्वांना मोठा धक्का होता. अंबाती रायुडूच्या 3-डी ट्विटचीही त्यावेळी खूप चर्चा झाली होती. (Team India)
आताही झाली भूतकाळातील गोष्ट. आता आपण वर्तमानाकडे नजर टाकू. 2019 च्या वर्ल्डकपपासून चौथ्या क्रमांकासाठीच्या फलंदाजाचा पर्याय तयार करण्यात अद्यापही अपयश आल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना चोख भूमिका बजावली, पण त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.(Team India)
चौथ्या क्रमांकावर कोण?
वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरणार्या फलंदाजाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. अशा परिस्थितीत या स्थानावर खेळणार्या खेळाडूचा बॅकअप नेहमीच तयार असायला हवा. आगामी आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाकडे आता फक्त काहीच वन-डे सामने शिल्लक आहेत. अशातच चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीस उतरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयसीसी वर्ल्डकप 2019 च्या उपांत्य सामन्यापासून टीम इंडियाने अनेक फलंदाजांना वन-डेमध्ये नंबर-4 वर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले. यात कोण यशस्वी झाला तर काहींनी निराशा केली.
श्रेयस अय्यरला ४ थ्या क्रमांकावर सर्वाधिक संधी
श्रेयस अय्यरला या फलंदाजीच्या क्रमवारीत सर्वाधिक संधी मिळाल्या. त्याने 20 डावांमध्ये 47.35 च्या सरासरीने आणि 94.37 च्या स्ट्राईक रेटने 805 धावा केल्या, पण आता वर्ल्डकपपूर्वी त्याच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कपाळावरील चिंतेची रेषा नक्कीच वाढली आहे.
पंतने आशा जागवल्या होत्या, पण…
ऋषभ पंतला 11 डावांत या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले. त्याने 36 च्या सरासरीने आणि 100 च्या स्ट्राईक रेटने 360 धावा केल्या. डिसेंबर 2022 च्या अखेरीस पंतचा अपघात झाला, त्यानंतर तो बराच काळ मैदानाबाहेर असणार आहे. यानंतर के.एल. राहुलला तीन डावांत चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि यादरम्यान त्याने 63 च्या सरासरीने आणि 89.15 च्या स्ट्राईक रेटने 189 धावा केल्या, पण राहुलला या स्थानावर अधिकची संधी मिळू शकलेली नाही.
इशान-सूर्यकुमार यांनी केले निराश
इशान किशनला चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्याची सहावेळा संधी मिळाली. त्यादरम्यान त्याने 21.20 च्या माफक सरासरीने फक्त 106 धावा केल्या. मनीष पांडेला तीन डावांसाठी तर सूर्यकुमार यादवला सहा डावांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, पण दोघांनीही निराशा केली. विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही प्रत्येकी एकदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
श्रेयसच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह
श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेला मुकावे लागले. अय्यरला या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानापासून तो बराच काळ दूर राहण्याची शक्यता आहे. अशातच त्याचे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगणार की काय, अशी भीती चाहत्यांना आहे. मात्र, श्रेयसने शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची दुखापत आणखी गंभीर होते का हे पाहावे लागेल.
अधिक वाचा :