पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नव संकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम संकल्पनांमधून, सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या 100 नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.
असा आहे कार्यक्रम
प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट 10 विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट 10 विजेत्यांमध्ये 30 टक्के महिला, 50 टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी 1 लाख बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील 10 अशा एकूण 360 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून, इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या 360 नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी 5 लाखांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत.
हेही वाचा :