पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी पुन्हा ट्विटर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापूर्वी नाकारण्यात आलेला करार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मस्क यांनी पुन्हा प्रति शेअर ५४.२० डॉलरने विकत घेण्याची ऑफर दिली आहे. तसेच ट्विटरच्या खरेदीवरून सुरू असलेली कायदेशीर लढाई थांबविण्याची अटही घातली असल्याची माहिती मिळत आहे. ट्विटरच्या इन्वेस्टर रिलेशन डिपार्टमेंटने मात्र याला दुजोरा दिला आहे.
टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी एप्रिलमध्ये ट्विटर विकत घेण्याचा करार केला होता, परंतु जुलैमध्ये त्यांनी माघार घेतली होती. सोशल साइटच्या बनावट खातेधारकांची नेमकी संख्या उघड करत नसल्याचा आरोप त्यांनी ट्विटरवर केला होता. या आरोपानंतर त्यांनी एकतर्फी करार संपविण्याची घोषणा केली. याविरोधात ट्विटरने अमेरिकन कोर्टात धाव घेतली. पण न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वीच मस्क यांनी नवीन ट्विटर खरेदीचा प्रस्ताव सादर केला आहे. ट्विटरने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. ट्विटरने म्हटले आहे की, ही खरेदी प्रति शेअर ५४.२० डॉलरने होणार आहे. मस्कच्या नवीन ऑफरचा अर्थ असा आहे की, याआधीची ऑफर मागे घेण्याविरुद्ध ट्विटरने त्यांच्या विरोधात सुरू केलेली कायदेशीर लढाई त्यांना संपवायची आहे.
मस्कने यूएस स्टॉक मार्केट रेग्युलेटरला माहिती दिल्यानंतर ट्विटरने एलन मस्कच्या पत्राची खात्री केली. यामध्ये त्यांनी ट्विटरला प्रति शेअर ५४.२० डॉलर या दराने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मस्क यांनी पत्रात काही अटीही नमूद केल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेली कारवाई थांबवण्याच्या अटीचाही समावेश आहे. या प्रकरणी ट्विटरचे वकील या आठवड्यात मस्कची चौकशी करणार आहेत.
मस्कच्या नवीन ऑफरनंतर, ट्विटरच्या शेअरची किंमत न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये जवळपास २३ टक्क्यांनी वाढून ५२ डॉलरवर पोहोचली आहे. पण एलन मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअरची किंमत ३ टक्क्यांनी घसरली आहे. मस्कने यापूर्वी ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा :