Latest

Delhi Mayor Election : दिल्ली महापौरपदाची निवड तिसऱ्यांदा रद्द

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा अधिवेशनात गदारोळ झाल्यानंतर एमसीडी महापौर निवड (Delhi Mayor Election)  तिसऱ्यांदा रद्द करण्यात आली आहे.दिल्लीच्या महापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया आजही (दि.६) पूर्ण होऊ शकली नाही. आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातील संघर्षामुळे यापूर्वी दोन निवडीची प्रक्रिया यशस्वी झाली नव्हती. आज पुन्हा दिल्लीच्या नव्या महापौरांच्या निवडीसाठी सभा बोलाविण्यात आली होती.

दरम्यान, दिल्लीच्या महापौर (Delhi Mayor Election)  आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडीसंदर्भात आज झालेली सभागृहाची तिसरी बैठक अनिर्णित राहिली. नामनिर्देशित सदस्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी गदारोळ केल्याने पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

निवडणुकीचे निकाल जाहीर होवून दोन महिने लोटले असतांना देखील दिल्ली महानगर पालिकेत महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आलेली नाही. या पदांच्या निवडणुकीला लागलेले शुक्लाष्टक अद्यापही संपलेले नाही. नायब राज्यपाल (एलजी) व्ही.के.सक्सेना यांच्या निर्देशानंतर सोमवारी तिसऱ्यांदा विशेष सभा बोलावण्यात आली होती.पंरतु, यंदाही सत्ताधारी आम आदमी पार्टी तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये शाब्दिक खटके उडाल्याने सभागृहात अभूतपुर्व गदारोळ बघायला मिळाला.अशात पुढील आदेशांपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आले आहे.

दुपारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच प्रत्येक सदस्याला तीन मतपत्रिका देण्यात आल्या. पंरतु, दिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१६ च्या निकालानूसार एलजी नामनिर्देशीत सदस्यांना देखील मतदानाचा अधिकार असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच आप च्या सदस्यांनी गोंधळ घातला.आप चे सभागृह नेते मुकेश गोयल यांना सदस्यांना शांत करण्याचे आवाहन करून देखील गदारोळ सुरूच राहीले १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

कामकाज पुन्हा सुरू होताच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, भाजपच्या नगरसेविका शिखा राय यांनी आपचे दोन आमदार अखिलेश त्रिपाठी तसेच इतर एका सदस्याविरोधात गुन्हा दाखल असून त्यांना मतदान करु न देण्याच्या मागणीनंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला.'गो बॅक,गो बॅक'च्या घोषणा आपच्या नगरसेवकांनी लावल्या.सभागृह त्यामुळे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

भाजप घटनात्मक पद्धतीने महापौर पदाची निवडणूक होवू देत नसल्याचा आरोप करीत यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे आप खासदार संजय सिंह यांनी सांगितले. तर,भाजप सदस्यांनी विनाकारण गोंधळ घालत सभा अनिश्चित काळाकरीता तहकूब करण्यासाठी भाग पाडल्याचे उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले. ७ डिसेंबर २०२२ रोजी आलेल्या एमसीडी निवडणूक निकालात आपला १३४ तर, भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. यानंतर महापौर पदाच्या निवडीसाठी ६ आणि २४ जानेवारी आणि ६ फेब्रुवारीला विशेष सभा बोलावण्यात आली होती.परंतु गदारोळामुळे अद्यापही महापौरांची निवड करण्यात आलेली नाही.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT