Latest

आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दूध संघाची सत्ता काबीज करण्यासाठी गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, सत्तेचा गैरवापर करून उमेदवारीबाबतचा नियम शेवटच्या 15 मिनीटात बदलविल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला. यावर बोलताना आमदार खडसे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. खोक्यांच्या मदतीने तुम्ही राज्याचे सरकार बदलू शकता. मात्र, या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत तुम्ही खोके वापरा की पेट्या वापरा, मतदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे कोणी काही केलं तरी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल, अशा इशारा एकनाथ खडसे यांनी विरोधकांना लगावला आहे.

जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मातब्बर नेते समजले जाणारे तसेच अनेक वर्षांपासून जिल्हा दूध संघावर मजबूत पकड असलेल्या एकनाथ खडसेंना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन आव्हान दिले आहे.

50 वर्षांची परंपरा 15 मिनिटात मोडली…

यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. जिल्हा दूध संघातील चोरी-अपहाराचे प्रकरणी दाखल करण्यात आहे. त्या बाबींची चौकशी न करता पोलीस संपूर्ण दूध संघाची चौकशी करत आहेत आणि हा पोलिसांचा कारभार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत, आहे त्या तालुक्यातील प्रतिनिधी न देता दुसऱ्या तालुक्यातील प्रतिनिधी सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव आणून दिले जात आहेत. 50 वर्षांची परंपरा पंधरा मिनिटात मोडण्यात आली. विरोधकांना उमेदवार मिळाला नाही म्हणून त्यांनी नियमच बदलला, असा आरोपही एकनाथ खडसेंनी केला आहे. फॉरेन्सिक ऑडिट अथवा कुठल्याही वकिलाकडून चौकशी करा अथवा हव्या त्या, एजन्सीकडून चौकशी करा माझी तयारी आहे आणि त्यात शोधून दाखवा.. एक रुपयाची सुद्धा चोरी केलेली नाही, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT