भरपाईपोटी जिल्ह्याला हवे 877 कोटी ! ऑक्टोबर महिन्यात साडेचार लाख हेक्टरचे नुकसान | पुढारी

भरपाईपोटी जिल्ह्याला हवे 877 कोटी ! ऑक्टोबर महिन्यात साडेचार लाख हेक्टरचे नुकसान

नगर :  पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे तब्बल 3 लाख 5 हजार 764 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांना तडाखा बसला आहे. बाधित शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी 590 कोटी 21 लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत जिल्ह्यातील एकूण 4 लाख 41 हजार 121 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 7 लाख 23 हजार बाधित शेतकर्‍यांच्या मदतीसाठी एकूण 877 कोटी 21 लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. दोन महिन्यांच्या नुकसानीचा संयुक्त अहवाल गुरुवारी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

खरीप हंगामात काहीच हाती लागले नसल्यामुळे शेतकरी नागवला गेला आहे. रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शासनाच्या अनुदानाकडे बाधित शेतकरी आशेने पाहू लागला आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी होत आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत हवा तेवढा पाऊस झाला. त्यामुळे पहिल्यातीन महिन्यांत जिल्ह्यातील फक्त 1 हजार 319.5 हेक्टर पिकांना तडाखा बसला होता. त्यामुळे 21 हजार 410 बाधित शेतकर्‍यांना 4 कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यात मात्र अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने कहर केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 1 लाख 35 हजार 357 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तडाखा बसला होता. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांना नवीन आदेशानुसार दुपटीने निधी उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 286 कोटी 99 लाख 59 हजार 600 रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडे 20 ऑक्टोबर रोजी पाठविलेला आहे.

ऑक्टोंबर महिन्यात मात्र, परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. जिल्हाभरात सर्वत्र झालेली अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यामुळे शेतपिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले . त्यामुळे पंचनामे करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पंचनामे रखडल्यामुळे ऑक्टोंबर महिन्यांतील अंतिम अहवाल शासनाला पाठविणे अवघड झाले होते. शेतपिकांच्या नुकसानीचे शंभर टक्के पंचनाम्यांचे काम 9 नोव्हेंबरला संपले आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऑक्टोंबर महिन्यातील नुकसानीचा अहवाल तयार केला. या महिन्यात एकूण 3 लाख 5 हजार 764 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तडाखा बसला. त्यामुळे लाखो शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. या बाधित शेतकर्‍यांना शासनाच्या नियमानुसार अनुदान देण्यासाठी तब्बल 590 कोटी 21 लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर व ऑक्टोंबर या दोन महिन्यांचा संयुक्त अहवाल शासनाकडे पाठविला आहे. बाधित शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी 877 कोटी 21 लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे शासनाला कळविले आहे.

तीन हेक्टरपर्यंत अनुदान उपलब्ध होणार
जिरायत क्षेत्रासाठी (हेक्टरी) : 13 हजार 600 रुपये
बागायती क्षेत्रासाठी : 27 हजार रुपये
फळबागासाठी : 36 हजार रुपये

सप्टेंबर महिन्यातील नुकसान
अतिवृष्टीचा फटका
बाधित क्षेत्र : 33 हजार 726 हेक्टर क्षेत्र
बाधित शेतकरी संख्या : 52 हजार 832
अपेक्षित निधी : 73 कोटी 93 लाख रुपये
सततचा पावसाचा फटका
बाधित क्षेत्र : 1 लाख 1 हजार 630 हेक्टर
बाधित शेतकरी संख्या :1 लाख 70 हजार 145
अपेक्षित निधी : 213 कोटी 7 लाख रुपये

ऑक्टोबर महिना

अतिवृष्टीचा फटका
बाधित क्षेत्र हेक्टर : 1 लाख 21 हजार 628.88
शेतकरी संख्या 2,02,236
अपेक्षित निधी 216 कोटी 97 लाख
सततच्या पावसाचा फटका
बाधित क्षेत्र : 1,84, 135 हेक्टर
शेतकरी संख्या 2,98,717
अपेक्षित निधी : 373 कोटी 24 लाख रुपये

Back to top button