मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत दीड हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'अ' आणि 'ब' वर्ग पदांसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागामार्फतची ही मोठी पद भरती आहे. आतापर्यंत या विभागामार्फत एकूण 1 हजार 584 वर्ग 'अ' आणि 'ब' पदांसाठीचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. यापैकी 1 हजार 269 पदे वैद्यकीय शिक्षण कक्षाची आहेत.
या पदांपैकी बहुतांश पदांसाठी आयोगामार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून, भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे देशमुख म्हणले. वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50 टक्क्यांपर्यंत भरण्याची मंजुरी मिळालेली आहे.
तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पद्धतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. वर्ग 4 संदर्भात मंजूर पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले.