पुढारी ऑनलाईन डेस्क : हुंड्यामध्ये जुने फर्निचर दिल्याने हैदराबादमधील एका नवरदेवाने लग्न मोडले आहे. बस ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद जकीरचे १९ फेब्रुवारी रोजी २२ वर्षीय हिना फातिमा हिच्याशी लग्न होणार होते. मात्र, तो विवाहस्थळीच पोहोचला नाही. जेव्हा वधूच्या पित्याने नवरदेवाचे घर गाठले. तेव्हा नवरदेवाकडून जुने फर्निचर दिल्याने मी हे लग्न मोडले असल्याचे सांगण्यात आले. वधूच्या पित्याने नवरदेवाकडून शिवीगाळ करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. (Dowry Case In Hyderabad)
मौला अली येथे शाळेच्या बसची ड्रायव्हिंग करणाऱ्या २५ वर्षीय जकीरचा विवाह २२ वर्षीय हिना फातिमा हिच्याशी होणार होता. हा दोघांचाही दुसरा विवाह होता. हिना बंदलागुडाच्या रहमत कॉलनी येथील राहिवासी आहे. रविवारी दोघांचा विवाह मशिदीजवळ होणार होता. विवाहाची सर्व तयारीही पूर्ण झाली होती. या विवाहासाठी पाहुणे मंडळी आली होती. मुलीकडील मंडळी नवरदेवाचे वऱ्हाड येण्याची वाट पाहत होती, मात्र हे वऱ्हाड काही शेवटपर्यंत आले नाही. (Dowry Case In Hyderabad) जेव्हा मुलीच्या वडिलांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांना समजले की, जकीरच्या कुटुंबाने लग्न मोडले आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मी मुलाच्या घरी गेल्यानंतर जकीरच्या कुटुंबीयांनी फर्नीचरबाबत प्रश्न विचारले. हुंड्यात दिलेले फर्निचर जुने असल्याचे जकीरच्या कुटुंबीयांनी सांगितले, असे मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. हिनाच्या वडिलांनी हुंड्यातील काही सामान विवाह होण्यापूर्वीच पाठवले होते. यातील पलंग तुटलेला होता. त्यामुळे जकीरच्या कुटुंबीयांनी जुने फर्निचर दिले आहे, असे म्हणत विवाह मोडला. यानंतर हिनाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.