Latest

Diwali Rangoli Designs : दिवाळीतील ‘रांगोळी’ वाढवते अंगणाची शोभा; जाणून घ्या रांगोळीचे विविध प्रकार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: रांगोळी हा भारतातील एक प्राचीन हिंदू कला प्रकार आहे. 'रंगवल्ली' या संस्कृत शब्दापासून रांगोळी हा शब्द निर्माण झाला. 'रांगोळी' या शब्दाचा अर्थ रंगांच्या रांगा असा होतो. भारतात अनेक सण उत्सव साजरे करताना, शुभप्रसंगी घर, अंगणात विविध रंगाच्या रांगा रेखाटल्या जातात, यालाच रांगोळी असे म्हटले जाते. (Diwali Rangoli Designs)

दिवाळीसारख्या अनेक हिंदु सणांमध्ये घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण उत्सवात रांगोळी काढण्याचे म्हत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय लोकांमध्ये देवांना आशीर्वाद देण्यासाठी घरी आमंत्रित करण्यासाठी अंगणात रांगोळी काढली जाते, असे सांगण्यात येते. रांगोळी काढण्यासाठी तांदळाची पावडर, विटांची पावडर, फुलांच्या पाकळ्या आणि विविध रंगांच्या वाळूचा देखील वापर केला जातो. (Diwali Rangoli Designs)

भारतीय संस्कृतीत केवळ प्रदेशानुसार रांगोळी या कलेत बदल होत नाही. तर देशातील विविध प्रदेशात रांगोळीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. रांगोळीच्या डिझाईन्स पारंपरिक, अत्याधुनिक ते भौतिकदृष्ट्या अचूक पद्धतीच्या असतात. भारतीय संस्कृतीत मुली आणि स्त्रिया या पारंपरिकपणे पिढ्यांपिढ्या रांगोळीच्या सारख्याच डिझाईन्स काढतात.

Diwali Rangoli Designs : स्टेन्सिल, स्टिकर्स असे रेडिमेंट डिझाईन्सही उपलब्ध

रामायणात उल्लेख आढळल्याने रांगोळीच्या कलाप्रकाराची प्रथा महाकाव्यांपेक्षा जुनी असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. दिवाळी सणासाठी अंगणात रांगोळी काढण्याची परंपरा आजही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. तसेच हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. रांगोळी काढण्याच्या कलेमध्ये प्रत्येकजण पारंगत नसला तरी, आज बाजारात विविध रांगोळी स्टेन्सिल आणि स्टिकर्स यांसारख्या रेडिमेंट डिझाईन्स देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

दिव्यांची रांगोळी

दिवाळीत लावण्यात येणार दिवे हे माती आणि तेलाचे असतात. दिवाळी हा सण साजरा करताना अंगण आणि परिसरात दिवे लावणे हा आपल्या संस्कृतीचा पारंपारिक भाग आहे. दीपावली या नावाचाच अर्थ दिव्यांचा सण आहे. पारंपरिकपणे दुष्टाचा अंधार घालवण्यासाठी घराभोवती दिव्यांच्या रांगा लावल्या जातात. तसेच रांगोळीच्या डिझाइनला सुशोभित करण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी देखील दिव्यांचा वापर केला जातो. दिव्याचा प्रकाश हा केवळ अंधार आणि वाईटाचा अंत नाही, तर ज्ञानाच्या तेजाचे आणि अज्ञानाच्या पराभवाचे देखील प्रतीक आहे.

Diya Rangoli: दिव्यांची रांगोळी

फुलांची रांगोळी

दिवाळीच्या काळात फुलांची रांगोळी खूप लोकप्रिय आहे. कारण पूजेच्यावेळी नेहमी देवांना ताजी फुलेच अर्पण केली जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार, झेंडू आणि आंब्याची पाने शुभ मानली जातात. अनेक शुभप्रसंगात रांगोळीसोबत झेंडुची लाल-पिवळी फुले आणि आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. त्यामुळे रांगोळीत देखील झेंडू, लाल गुलाबाच्या पाकळ्यांसह आंब्यांची पाने वापरली जातात. यामुळे हवेत एक समृद्ध ताजातवाना सुगंध निर्माण होतो.

Flower Rangoli (फुलांची रांगोळी)

मुक्तहस्त (फ्रीहँड) रांगोळी

भारताला अनोख्या रांगोळी प्रकारांचा समृद्ध वारसा आहे. मुक्तहस्त रांगोळी प्रकारात कलाकाराला त्याच्या कल्पनेने रांगोळी तयार करण्याचे स्वातंत्र्य देते. रांगोळी कला ही केवळ परंपरा साजरी करण्याचेच नव्हे तर विविध नाविन्यपूर्ण डिझाईन थीम नव्याने तयार करण्याचे माध्यम बनते. आधुनिक काळात विशेष प्रसंग चिन्हांकीत करण्यासाठी संपूर्ण रस्ता कव्हर करण्यासाठी फ्रीहँड रांगोळी काढण्यात येते.

Freehand Rangoli :मुक्तहस्त (फ्रीहँड) रांगोळी

स्टेन्सिल रांगोळी

रांगोळीच्या कलेमध्ये पारंगत नसलेल्यांसाठीही तसेच रांगोळीची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी स्टेन्सिल तयार करण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे सिल्कस्क्रीनवर फ्लॅट स्टेन्सिल बनवले जातात. गोलाकर फ्रेम्सह विविध आकारात हे स्टेन्सिल बनवले जातात. यावर रंगीत रांगोळी किंवा तांदळाच्या पीठाचा वापर करून रांगोळीच्या डिझाईन्स काढल्या जातात. छिद्रित नमुन्यांसह दंडगोलाकार पाईप्सचा वापर रोलर स्टेन्सिल म्हणून केला जातो. यामध्ये पाईपमध्ये रांगोळी भरून रोलर फिरवून रांगोळीची एकसारखी कलाकृती साकारली जाते.

दक्षिणेकडील राज्यांत 'कोलाम' शैलीतील रांगोळी

तामिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये रांगोळी या कलाप्रकाराला कोलाम म्हणून ओळखले जाते. दररोज अंगणात साध्या पद्धतीची रांगोळी काढली जाते, तर सणासुदीला मोठी, कलरफुल रांगोळी अंगणात काढली जाते. तांदळाच्या पावडरीने हाताच्या साहाय्याने सममित रेषा आणि वक्र वळणांची गुंतागुंतीच्या डिझाईन्स बनवलेल्या जातात. कोलाम प्रकारत भौमितिक अचूकता आणि सूक्ष्म रेषांद्वारे रांगोळी परिभाषित केली जाते.

Kolam: दक्षिणेकडील राज्यांत कोलाम शैलीतील रांगोळी

उत्तराखंडच्या कुमाऊं क्षेत्रातील 'आयपन' रांगोळी

आयपन ही रांगोळी शैली उत्तराखंडच्या कुमाऊं क्षेत्राशी संबंधित आहे. पारंपरिकपणे गेरूच्या चिखलाने तयार केलेल्या पृष्ठभागावर तांदूळ पावडरच्या (बिस्वर) साहाय्याने आयपन या शैलीत रांगोळी काढली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे दर्शविणारे पदचिन्ह मुख्य प्रवेशद्वारापासून आतील पूजेच्या ठिकाणापर्यंत काढले जाते. या माध्यमातून धनाच्या देवीचे स्वागत करत, आगामी वर्षासाठी तिचा आशीर्वाद घेतला जातो. अंगण, दार ते घरात आतल्या पूजेच्या ठिकाणापर्यंत वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळ्या आयपन डिझाइन काढल्या जातात. दिवाळीला लक्ष्मीपीठ काढून त्याठिकाणी देवीची मूर्ती ठेवली जाते आणि पूजा केली जाते.

Aipan: उत्तराखंडच्या कुमाऊं क्षेत्रात आयपन रांगोळी

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT