Latest

वाद एकाशी; हल्ला दुसऱ्यावरच ! स्वामी चिंचोली जवळील घटना

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वी दोन युवकांच्या किरकोळ भांडणातून झालेल्या वादानंतर माफी मागण्याच्या बहाण्याने एकाने वाद झालेल्यांमधील एका युवकाला बोलावले; मात्र ओळख पटण्याआधीच सोबत आलेल्या युवकावरच हल्ला केल्याची घटना भिगवणजवळ घडली. या घटनेत भिगवण येथील जय भवानी मच्छी खानावळीचे मालक व शिवसेना वैद्यकीय कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक विशाल रामदास धुमाळ (वय ३४, रा. मदनवाडी भिगवण, ता. इंदापुर) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बारामती येथे उपचार सुरू आहेत.

ही घटना बुधवारी (दि. ९) सायंकाळी भिगवणजवळ परंतु दौंड तालुक्याच्या हद्दीत स्वामी चिंचोली जवळ घडली. यावरून रावणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार शिवम कांबळे (रा. दौंड, पूर्ण नाव आणि पत्ता नाही) हा आहे. या घटनेची फिर्याद राहुल राजेंद्र ढवळे (रा. मदनवाडी, ता. इंदापुर) यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि. ६) यातील फिर्यादीचा भाऊ अक्षय ढवळे हा जनावरांचा चारा आणण्यासाठी शेतात चालला असताना त्याच्या गाडीला अनोळखी युवकाने कट मारला. यावेळी उलट त्यालाच आपल्याला कट मारतो काय? असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत दुचाकीची चावी काढून घेतली. यावरून चुलत भाऊ अक्षय ढवळे याने ही घटना राहुल ढवळे यास सांगताच राहुल याने समजूतदारपणा घेत वाद मिटवला होता.

दरम्यान बुधवारी (दि. ९) राहुल ढवळे यांना मोबाईलवर फोन आला व आपण शिवम कांबळे बोलतोय, त्या दिवशीच्या घटनेबाबत माफी मागायची आहे. मी आपल्या टपरीजवळ आलो आहे असे त्याने सांगितले. यावर ढवळे यांनी बाहेर असल्याचे सांगितले; मात्र तरीही ते सतत फोन करीत होते. अखेर ढवळे व विशाल धुमाळ थांबलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरून पाचजण आले आणि त्यांनी विशाल यास तूच का राहुल ढवळे असे विचारत शिवीगाळ, मारहाण सुरू केली. त्यावर राहुल यांनी दोघांना पकडले व विशालने दोघांना पकडले; मात्र शिवम याने विशाल याच्या पोटावर कोयत्याने वार केला. दुसरा वार डोक्यावर करत असताना विशालने तो चुकवला. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून हे सर्व पळून गेले असे राहुल ढवळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

रस्ते झाले जाम

दरम्यान विशाल धुमाळ यांचे सामाजिक काम व मित्र परिवार मोठा असल्याने घटना समजताच युवकांनी मोठी गर्दी केली. त्यांना बारामती येथे उपचारासाठी नेताना बारामती येथेही मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT