Latest

Uddhav Thackeray : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सरकार बरखास्त करा : उद्धव ठाकरे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात मागील काही दिवसांपासून खून, मारमाऱ्या, गुंडागर्दी वाढलेली आहे. त्यामुळे राज्यातील जनता संतप्त आणि उद्विग्न झालेली आहे. बेबंदशाहीमुळे राज्यातील जनता दुखावली आहे. सरकराच्या आश्रयामुळे राज्यात गुंडगिरी सुरू आहे.जनतेचे संरक्षण हा मोठा चिंतेचा विषय आहे. राज्याला मनोरूग्ण गृहमंत्री मिळाला आहे की काय ? अशी परिस्थिती आहे, असा शब्दांत हल्लाबोल करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावून घटनाबाह्य सरकार बरखास्त करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. Uddhav Thackeray

आता सरकारमध्ये गँगवार सुरू झाले आहे. कलंक, फडतूस असे शब्द मी गृहमंत्र्यांसाठी वापरले होते, पण आता याही पेक्षा दुसरा शब्द माझ्याकडे नाही. निर्ढावलेला, निर्घृण मनाचा गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. एखाद्या मनुष्याच्या मृत्यूची तुलना श्वानाशी करणे किती चुकीची आहे, हेही त्यांना समजतं नाही. गुंडांवर जरब बसवू शकत नाहीत. भाजपमध्ये या आणि सगळं विसरा, अशी मोदी गॅरंटी मिळत आहे का ? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरीसकडे परवाना धारक शस्त्र नव्हते. त्याने अंगरक्षकाच्या शस्त्रातून गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. मग त्याने स्वत: का आपले जीवन संपवले, अशी शंका उपस्थित करून दोघांनाही कुणी मारण्याची सुपारी दिली होती का ? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमादरम्यान पत्रकार निखिल वागळे, अॅड. असीम सरोदे यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. सरोदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचे वस्त्रहरण उत्तमपणे केले होते. त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या गुंडांनी हा हल्ला करण्याची धमकी देऊनही पोलिसांनी कोणतही कारवाई केली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला संबोधित करणारे पत्र लिहिले आहे, असे पत्र आतापर्यंत कोणत्याही महासंचालकाने लिहिलेले नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

राज्यातील या परिस्थितीबाबत आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. कारण राज्यपालांकडून कोणतीही अपेक्षा करणे आता आम्ही सोडून दिले आहे. राज्यपाल पद असावे की नको? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेला संरक्षण मिळावे, लोकशाही वाचवा, न्याय मिळावा, अशी विनंती आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावर सत्ताधारी पक्षांना मत न देणे हा एकच उपाय जनतेच्या हातात शिल्लक राहिलेला आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT