पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M. S. Dhoni) याने मॅच फिक्सिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत संपत कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि काही वरिष्ठ वकिलांच्या विरोधात कथित वक्तव्ये केल्याचा आरोप धोनीने केला आहे. तसेच संपत कुमार यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याची आणि त्यांना समन्स बजाविण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयात या प्रकरणावर आज (दि.५) सुनावणी होऊ शकली नाही. आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
२०१४ मध्ये धोनीने (M. S. Dhoni) तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संपत कुमार यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. १०० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती.
न्यायालयाने १८ मार्च २०१४ रोजी संपत कुमार यांना धोनीविरोधात कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखणारा अंतरिम आदेश दिला होता. तरीही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायपालिका आणि त्यांच्याविरोधात राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली आहे. दरम्यान, आता धोनीने संपत कुमारवर वरिष्ठ वकिलांच्या विरोधात कथित विधाने केल्याचा आरोप केला आहे आणि त्याच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याची आणि त्याला समन्स बजावण्याची मागणी केली आहे.
हेही वाचलंत का ?