Latest

Ashish Deshmukh: आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी? देवेंद्र फडणवीसांनी घेतली भेट

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: आगामी निवडणुकीत काटोल अथवा सावनेरमधून भाजपचा उमेदवार कोण ? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२०) सकाळी भाजपचे माजी आमदार, काँग्रेसचे निलंबित युवानेते डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे देशमुख यांची लवकरच भाजपात घरवापसी होणार अशी चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते देशमुखांच्या (Ashish Deshmukh) घरी पोहोचले. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख हे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. काटोल किंवा सावनेर असा चॉईस असू शकतो, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला असून त्याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांनी काल सावनेरमध्ये तुमच्यातीलच एक उमेदवार असेल, नवा प्रयोग केला जाणार नाही, असे सूचक वक्तव्य केले होते. त्याचा अर्थ आजच्या या भेटीशी जोडला जात आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचे तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कारण आशिष देशमुख यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात सावनेरमध्ये सध्या भाजपकडे तगडा उमेदवारही नाही. त्यामुळे यंदा देशमुखांना संधी मिळणार, अशी चर्चा सुरु आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोलमधून लढले आणि त्यांचे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींसोबत पंगा ओढवून घेतला.

आशिष देशमुख यांनी त्यांचे वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त, 29 मे रोजी सावनेरमध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्ताने ही सदिच्छा भेट होती, असेही सांगण्यात आले. स्वतः देशमुख यांनी फडणवीस यांच्याकडूनच विदर्भाला अपेक्षा असल्याचे गुणगान करीत ते घरी नाश्ता करण्यासाठी आल्याचे सांगितले. गेल्यावेळी आशिष देशमुख, फडणवीस यांच्याविरोधात नागपूर दक्षिण पश्चिममधून उभे ठाकले होते हे विशेष.

सावनेर हा रणजीत देशमुख यांचा जुना मतदारसंघ असून सुनील केदार यांच्यापूर्वी रणजीत देशमुख हेच सावनेरचे आमदार होते. 1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सुनील केदार यांनीच रणजित देशमुख यांचा पराभव केला होता. आता 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परंपरागत देशमुख-केदार लढत पहायला मिळणार का ? अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT