नागपूर : अनेक आमदारांना घातलाय गंडा! नीरजला घेऊन पोलीस नागपुरात | पुढारी

नागपूर : अनेक आमदारांना घातलाय गंडा! नीरजला घेऊन पोलीस नागपुरात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील शिंदे- भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवून देण्यासाठी थेट भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या आवाजात, त्यांच्या पीएच्या नावाने पैसे घेत गंडा घालणारा संशयित आरोपी नीरज सिंह राठोड याला गुजरातमध्ये अटक केल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखा पोलिस पथक नागपुरात पोहचले.

एकीकडे 20 ते 22 मे दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होणारच असा दावा करीत नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्याच वेळी स्वत:ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पीए म्हणवून घेणाऱ्या नीरजसिंह राठोडने संघ मुख्यालय आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील दोन आमदारांसह महाराष्ट्रातील सुमारे 12 आमदारांना फोनवर मंत्री करण्याची ऑफर दिली. संघ परिवारातील एका कार्यक्रमाचे दोन दिवसांच्या जेवणाचे बिल देण्यासाठी दडपण आणले. काही आमदार या भूलथापांना बळी देखील पडल्याची माहिती आहे. मात्र, टाईल्सच्या व्यवसायात असलेल्या नीरजला एक मुलगा असून उत्तरप्रदेशचा मूळ रहिवासी असलेल्या नीरज राठोडची फारशी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी एक 420 चा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, तो गुन्हा याच प्रकारातील आहे की दुसरा याविषयीची सविस्तर माहिती पोलिसांच्या पुढील तपासातच उलगडणार आहे. आज पोलीस त्याला न्यायालयात हजर करणार असून पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडून अनेक बाबी उलगडणार आहेत.

नीरज स्वतः नड्डा यांचा आवाज काढायचा की आणखी कुणी या गोरखधंद्यात सहभागी होते याचाही माग पोलिस घेत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारीला कर्नाटकमधून नागपुरात आणल्यानंतर अनेक खुलासे झाले. आता आमदारांना गंडविणाऱ्या आरोपीकडून काय वास्तव पुढे येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पोलिसांपुढे हे प्रकरणही आव्हानास्पद आहे हे विशेष. मध्य नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधल्याने या आरोपीचे बिंग फुटले. कुंभारे यांच्याच तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. नागपूर पोलिसांनी नीरजला त्या मोबाईलसह गुजरातमधून अटक केली. मात्र, त्याने आतापर्यंत नड्डा यांच्या नावाने भाजपची सत्ता असलेल्या राज्यात किती आमदारांना फोन करून पैसे मागितले याची माहिती गुन्हे शाखा पोलिस घेत आहेत.

Back to top button