Latest

Devendra Fadnavis/Nitin Gadkari : केंद्रात फडणवीस, राज्यात गडकरी? रा. स्व. संघाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी ‘प्लॅन बी’

अमृता चौगुले

पुणे : पुण्यातील संघाच्या बैठकीत झालेल्या मंथनानंतर सरसंघचालकांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सत्तेसाठी एक निष्कर्ष काढण्यात आला. तो म्हणजे, गरज पडली तर राज्याच्या नेतृत्वात बदल करून देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी सर्वसमावेशक नेता समजले जाणारे नितीन गडकरी यांना राज्यात परत पाठवणे योग्य राहील. गडकरींप्रमाणेच केंद्रात फडणवीस यांना महत्त्वाचे खाते देऊन राज्यात विकासगंगा आणली जाऊ शकते, असा सूर संघाच्या बैठकीत समारोपाच्या पूर्वसंध्येला आळवला गेल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

पुणे शहरातील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या तीन दिवसीय संघाच्या समन्वय बैठकीत विविध 36 संघटना प्रतिनिधींनी अहवाल सादर करून चर्चा केली. यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सामान्य जनता असमाधानी असून, भाजपच्या कृतीवर शंका व्यक्त करीत असल्याचा मुद्दा समोर आला. याशिवाय सोबत आलेली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबरीने स्थापन केलेली सत्ता हेदेखील सामान्यांना न रूचणारे असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात संघाचे स्वयंसेवक म्हणून फिरताना या गोष्टी ऐकाव्या लागत असल्याचेही पदाधिकार्‍यांनी भावना व्यक्त करताना स्पष्ट केल्याचे समजते.

चर्चेतून आला 'प्लॅन बी'चा पर्याय

राज्यातील सत्तांतरावरून होत असलेले वाद आणि लांबत चाललेली न्यायालयीन लढाई मतदारांना द्विधा मन:स्थितीत टाकणारी होत चालली आहे. यावर काही तरी आपण उपाय सुचवावा, अशीही विनंती सरसंघचालकांना काही प्रतिनिधींनी केली. सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर सरसंघचालकांनी तुम्हाला काय वाटते, यावर तुमचे मत मांडा, अशा सूचना केल्या. त्यावर राजकीय पक्षाशी निगडित असलेल्या काही संघटना प्रतिनिधींनी विश्लेषणात्मक मांडणी केली.

त्यांच्या मते, भविष्यात राज्यात एकहाती सत्ता हवी असल्यास नेतृत्व बदल या पर्यायावर विचार केला जाऊ शकतो. या चर्चेत काही प्रतिनिधींनी त्यांची मते ठेवत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या नावाचा पर्याय सुचवला. याशिवाय त्यांना राज्यात पाठवणे म्हणजे इतर सर्वपक्षीय नेत्यांची सहमती मिळण्यासारखे होईल. विशेष म्हणजे, शरद पवारदेखील विरोध न करता पाठिंबा देऊ शकतात. 2019 च्या निवडणुकीत 'प्लॅन बी' तयार न केल्याने भाजपची मोठी अडचण झाली होती, असाही मुद्दाही यावेळी काही सदस्यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूरच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

संघाच्या बैठकीचा समारोप होत असताना आणखीन एक पर्याय सुचवला गेला तो म्हणजे गुजरातमधील भूज येथील बैठकीनंतर नागपूरमध्ये होणार्‍या बैठकीत या विषयावर योग्य निर्णय घेऊन शिक्कामोर्तब करावे, असे सुचवले गेल्याचे समजते.

बाकरवडी अन् आंबा बर्फीचा आस्वाद

या बैठकीत देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचा खास पुणेरी पद्धतीचा पाहुणचार करण्यात आला. रिफ्रेशमेंटसाठी पुणेरी खमंग बाकरवडी अन् आंबा बर्फीचा आस्वाद प्रतिनिधींसह सरसंघचालकांनी घेतला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT