वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : पाकिस्तान आर्थिक संकटाच्या खाईत आहे. लोकांची अन्नान्नदशा झालेली आहे. याउपरही पाकिस्तानने अण्वस्त्रांचा साठा वाढवणे सुरूच ठेवलेले आहे. पाकिस्तानकडे सध्या 170 अण्वस्त्रे असल्याचे अमेरिकेतील अणुशास्त्रज्ञांनी आपल्या अहवालातून स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानने 2025 पर्यंत 200 चा टप्पा ओलांडलेला असेल, असे भाकीतही या अहवालातून वर्तविले आहे. '2023 पाकिस्तान न्यूक्लियर हँडबूक' असे नाव या अहवालाला देण्यात आले आहे.
2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 अण्वस्त्रे असतील, असा अंदाज याआधी 1999 मध्ये अमेरिकेतील संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. अण्वस्त्रे शर्यतीत पाकिस्तान यापेक्षा कितीतरी पुढे निघालेला आहे. अनेक गुप्त दस्तऐवजांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांशी संबंधित माहिती गोळा केली आहे, हे विशेष!
जमीन आणि समुद्रातून डागल्या जाणार्या क्रूझ क्षेपणास्त्रांमध्ये सातत्याने बदल करतो आहे. दुसरीकडे भारत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करत आहे, असेही या अहवालात नमूद आहे. भारतीय बॅलिस्टिकला उत्तर म्हणून पाकिस्तानने एक मध्यम श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार केले आहे. 'अबाबिल' असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे.
'मिराज-3', 'मिराज-5' या विमानांतून पाकिस्तान अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतो. एक बॉम्बर विमान मसरूर हवाई तळावर, तर दुसरे रफिकी हवाई तळावर तैनात आहे.
पाकिस्तानच्या आण्विक क्षेपणास्त्र तळ आणि सुविधांची माहिती मिळू शकलेली नाही, असे या अहवालात म्हटलेले असले तरीही पाकिस्तानचे 5 क्षेपणास्त्र तळ उपग्रहिय छायाचित्रांच्या माध्यमांतून जगासमोर आलेले आहेत.
इस्लामाबादमध्ये केंद्र
अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आणि त्यांचे मोबाईल लाँचर्स (प्रक्षेपक) इस्लामाबादच्या पश्चिमेला काला चित्ता दाहर पर्वत रांगेतील राष्ट्रीय संरक्षण संकुलात विकसित केले जात आहेत. या संकुलाचे दोन भाग उपग्रहांनी टिपले असून, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट इंजिने पश्चिम भागात विकसित केली जातात. कहुता आणि गडवाल भागात अण्वस्त्रांसाठी युरेनियम प्लांट तयार करण्याचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे या अहवालात म्हटलेले आहे. पाकिस्तान चार हेवी वॉटर प्लुटोनियम उत्पादन अणुभट्ट्याही उभारत आहे.