पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा आयोगासमोर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्य सचिव आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक या तिघांची साक्ष महत्त्वाची आहे. या साक्षीदारांची उलटतपासणी झाल्याशिवाय आयोगाचे कामकाज पूर्ण होऊ शकणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर अॅड. आंबेडकर यांची शनिवारी उलटतपासणी घेण्यात आली. त्यानंतर अॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
संबंधित बातम्या :
'राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्य सचिव सुमित मलिक आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक या तिघांची साक्ष महत्त्वाची आहे. या तीन प्रमुख साक्षीदारांची साक्ष झाल्यावरच आयोगाचे कामकाज पूर्ण होऊ शकेल. त्या वेळीच घटना नेमकी काय घडली, कशी घडली, कोणी घडविले, याचा उलगडा होऊ शकणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. त्या घटना कशा रोखता येईल, हे पाहणे आयोगाचे काम आहे. त्यामुळे या तीन जणांची साक्ष नोंदविण्यात यावी,' अशी मागणी या वेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
विरोधकांच्या इंडिया आघाडीची सभा नुकतीच मुंबईत झाली. त्या बैठकीला आंबेडकर यांना डावलण्यात आले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे हे आपली बाजू मांडतील, असे आंबेडकर यांनी सांगितले होते. त्याबाबत विचारता, 'ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणताही निरोप आला नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरेच निर्णय देतील, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. त्यावर काँग्रेसच्या अध्यक्षांनी बोलायला हवे,' असे आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा