दिवसभरात नियोजित वेळेआधी सर्व कार्यक्रम करतानाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची देहबोली धडाकेबाज निर्णय घेणारी होती.  
Latest

वेळेआधीची ‘दादागिरी’, खाड खाड आणि धाड धाड अजितदादा

सोनाली जाधव

सातारा : हरीष पाटणे; सातारा जिल्ह्याने अजितदादांची हटके 'दादागिरी' अनेकदा अनुभवली आहे. वेळेवर उपस्थित राहून कामांचा झपाटा दाखवणारे अजितदादा सातारा जिल्ह्याच्या जनतेला यापूर्वी अनेकदा पहायला मिळाले. राज्यातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नियोजित कार्यक्रमाच्या वेळेवेळी गर्दी होणार हे लक्षात आल्याने गर्दी टाळण्यासाठी वेळेआधी तीन तास येवून सातारा जिल्ह्यातील कामांचा धडाका उठवणारी अजितदादांची जिगरबाज देहबोली सोमवारी जिल्ह्याला पहायला मिळाली. वेळेआधीच्या या 'दादागिरी'त खाड खाड अजितदादा, धाड धाड अजितदादा असाच सोमवारचा कार्यक्रम राहिला.

दिवसभरात नियोजित वेळेआधी सर्व कार्यक्रम करतानाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची देहबोली धडाकेबाज निर्णय घेणारी होती.

सोमवारी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे भरगच्च कार्यक्रम जिल्ह्यात होते. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल होती. मात्र, रविवारी बारामतीत अजितदादांनी जी करामत केली तीच त्यांनी सोमवारी सातार्‍यात केली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे गर्दी टाळून 50 माणसांच्या निर्बंधात कोणतेही कार्यक्रम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असल्याने आपण स्वत: नियमभंग करणे योग्य नाही. त्याऐवजी कृतीतून संदेश देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळेच कोणालाही कल्पना न देता त्यांनी नायगावच्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या अभिवादनाला सकाळी 7.30 वाजताच हजेरी लावली. भल्या भल्यांची त्यांनी तारांबळ उडवली. कुणी अंथरुणात होता, कुणी पूजेला बसला होता, कोण रस्त्यातच होता, तर कोणाचा फोनच लागत नव्हता, अशा परिस्थितीत अजितदादा मात्र नायगावात जावून धडकले होते. त्यांनी विकास आराखड्याची बैठकही तिथेच घेतली. जे कार्यक्रम सायंकाळी सातार्‍यात होणार होते त्यात नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कोनशीलेचे अनावरण, सातारा सिव्हील हॉस्पिटलमधील प्रयोगशाळेचे भूमीपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन या कार्यक्रमांचा धडाका त्यांनी सकाळीच करुन घेतला.

पत्रकार परिषदही घेतली. सकाळी 10.30 वाजता त्यांनी सातारा सोडलाही. आपण जे नियम करतो ते आपण स्वत: पाळले पाहिजेत त्यासाठी कराव्या लागणार्‍या कसरती अजितदादांनी स्वत: केल्या. त्या चार तासात अजितदादांच्या झटक्याचा अनुभव अनेकांना आला. सातारा जिल्ह्याला छप्पर फाडके निधी देण्यासाठी त्यांनी धडाधड निर्णय घेतले. वेळेच्या आधी येवून त्यांनी अनेकांची फिरकीही घेतली. खाड् खाड् अजितदादा आणि धाड् धाड् अजितदादा असेच त्यांच्या सोमवारच्या सातारा जिल्ह्याच्या दौर्‍याचे वर्णन करावे
लागेल.

नियम तोडणे माझ्या बुद्धीला पटत नाही…

जिल्ह्यात ठरलेल्या वेळेआधी येण्याचे कारणही अजितदादांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, राज्यात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत चालले आहेत. मी बारामतीतही वेळेच्या आधीच एकतास जाऊन उद्घाटने केली आहेत. सातार्‍यातही सायंकाळची वेळ दिली होती. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने 50 पेक्षा जास्त व्यक्ती कार्यक्रमाला असणे म्हणजे आम्हीच नियम मोडल्यासारखे होत आहे. त्यामुळे मीच नियम तोडणे माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणूनच सकाळी सकाळी कार्यक्रम उरकल्याचे ना. अजितदादांनी सांगितले.

तुम्ही मुंबईत या, एका रात्रीत धुरळा उडवू….

जिल्ह्यातील सर्किट हाऊस, मेडिकल कॉलेज, पोलिस अधीक्षक कार्यालय, प्रत्येक तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांची बांधकामे व दुरुस्ती रखडली आहे. याबाबत अधिकार्‍यांनी माहिती देताच ना. अजितदादांनी तुम्ही मुंबईत या, एका रात्रीत सगळा धुरळा उडवू. जानेवारी अखेर सर्व प्रस्ताव मला आले पाहिजेत, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला त्यांनी केल्या.

'नवीन वर्षात पहिलेच काम सांगतोय, सातारा एसपी ऑफिस हे राज्यात एक नंबरचे झाले पाहिजे…

ना. अजितदादांच्या सातारा जिल्हा दौर्‍यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे त्यांच्याबरोबरच होते. यावेळी विविध कार्यालयांच्या कामाबाबत विषय निघाला असताना ना. अजितदादांनी एसपी ऑफिसबाबत विचारणा केली. त्यावर बन्सल यांनी याबाबत प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. यावर अजितदादांनी थेट मंत्रालयातील संबंधित अधिकार्‍याला फोन लावला. 'नवीन वर्षात पहिलेच काम सांगतोय, सातारा एसपी ऑफिस हे राज्यातील एक नंबरचे झाले पाहिजे. जसा बारामतीच्या एसपी ऑफिसचा प्लॅन केला तसाच सातारचाही करा. दि. 31 जानेवारीच्या आत हा विषय संपला पाहिजे. तुमचा आर्किटेक्चर आहे का बघा नाहीतर मी माझा आर्किटेक्चर देतो. पण काम लवकर झाले पाहिजे', असे उपमुख्यमंत्र्यांनी सुनावले. त्यांच्या या खमक्या कार्यपध्दतीचे उपस्थितांना कौतुक वाटले.

जेवताना कोणीपण येणार आणि तिथेच खारखुर करत बसणार!

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार स्पष्ट वक्‍तेपणाबद्दल परिचित आहेत. त्याचा प्रत्यय सातारा दौर्‍यात सोमवारी आला. सर्किट हाऊस विस्तारीकरण शुभारंभप्रसंगी बोलताना ते म्हणाले, सातार्‍यातील सर्किट हाऊसच्या नव्या इमारतीचे काम उत्तम प्रकारचे होत आहे. यात एक व्हीव्हीआयपी कक्ष, 2 व्हीआयपी कक्ष व 5 साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसेच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी वॉश बेसिन वेगळे पाहिजे. डायनिंगच्या ठिकाणचे वॉश बेसिन वेगळे ठेवा नाहीतर जेवताना कोणीपण येणार आणि तिथेच खारखुर करत बसणार तसे नको आहे, असे त्यांनी अधिकार्‍यांना ठणकावले.

राजे, लोकांना सांगा जागा द्यायला…

विश्रामगृहाच्या विस्तारीकरण व कोनशिला अनावरणानंतर ना. अजितदादा यांनी उपस्थित आमदारांशी चर्चा केली. यावेळी तहसील, प्रांत, शासकीय विश्रामगृह इमारतींबाबतची माहिती घेतली. आ. दीपक चव्हाण यांनी फलटण येथे कार्यालयासाठी जागेचा प्रॉब्लेम येत असल्याचे सांगितले. त्यावर ना. पवार यांनी दीपक चव्हाण यांना चिमटा काढला. ते म्हणाले, राजे लोकांना सांगा जागा द्यायला म्हणजे कार्यालयांचा प्रश्‍न लवकर मिटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT