गायींसाठी खास बेडरूम, बेड आणि टॉयलेटही! | पुढारी

गायींसाठी खास बेडरूम, बेड आणि टॉयलेटही!

जोधपूर : गाय-बैलांपासून ते कुत्र्या-मांजरापर्यंत अनेक प्राणी माणसाच्या जवळचे आहेत. मात्र, गाय-बैलांची व्यवस्था स्वतंत्र गोठ्यात केलेली असते आणि मांजरासारखे छोटे प्राणी घरभर फिरत असतात. राजस्थानमधील एका कुटुंबाच्या घरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळते. तिथे गायींना घरातच पाळले असून गायींसाठी खास बेडरूमची व्यवस्था आहे. या अद्ययावत बेडरूममध्ये मोठ्या पलंगावर गायी आरामात पहुडलेल्या असतात. त्यांनी ब्लँकेटही परिधान केलेले असते. या कुटुंबाने अशा तीन गायी घरात ठेवलेल्या आहेत.

या गायींचा एक व्हिडीओ दोन आठवड्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. त्याला मोठीच प्रसिद्धी मिळाली आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 60 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या तीन गायींची नावे गोपी, गंगा आणि पृथू अशी आहेत. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक गाय घरातील बेडवर बसलेली दिसत आहे.

तिला थंडी वाजू नये म्हणून मऊ ब्लँकेटही पांघरण्यात आले आहे. या गायींसाठी खास टॉयलेटचीही व्यवस्था आहे. तिथेच जाऊन या गायी मलमूत्र विसर्जन करतात व त्यामुळे बेडरूममध्ये घाण होत नाही. इन्स्टा यूजरने गायींचे काळजी घेण्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.

Back to top button